Join us  

परिचारिका होणार ‘स्मार्ट’

By admin | Published: May 13, 2016 4:32 AM

रुग्णांची सेवा करणाऱ्या, रुग्णांना वेळच्या वेळी औषधे देणाऱ्या परिचारिका काळानुरूप बदलून आता ‘स्मार्ट’ होणार आहेत. ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’मध्ये (एमएनसी) नोंदणी असलेल्या प्रत्येक

मुंबई : रुग्णांची सेवा करणाऱ्या, रुग्णांना वेळच्या वेळी औषधे देणाऱ्या परिचारिका काळानुरूप बदलून आता ‘स्मार्ट’ होणार आहेत. ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’मध्ये (एमएनसी) नोंदणी असलेल्या प्रत्येक परिचारिकेला आता एक ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. यावरील कोडवरून त्या परिचारिकेची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जागतिक परिचारिका दिन आणि ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’चे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित एका कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच परिचारिकांना ‘स्मार्ट कार्ड’चे वाटप करण्यात आले.बिर्ला मातोश्री सभागृहात गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळानुरूप परिचारिकांच्या शिक्षणात, कामाच्या स्वरूपात बदल झाले. त्याचप्रमाणे कौन्सिलही हायटेक करण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल उचलण्यात आले आहे. खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखान्यांमध्ये परिचारिका रुग्णांची सेवा करीत असतात. पण, त्या वेळी परिचारिका प्रशिक्षित आहे की नाही, याची खातरजमा कोणीच करत नाही. त्यामुळे अनेकदा फसवणूक होऊ शकते. असे प्रकार टाळण्यासाठी प्रशिक्षित नोंदणीकृत परिचारिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी स्पष्ट केले. गेल्या २२ वर्षांपासून कौन्सिलचे कार्यालय हे मुलुंड येथे होते. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना, कौन्सिलचे कार्यालय पुन्हा जुन्या जागी फोर्ट येथे सुरू करण्यात आले. हे कार्यालय हायटेक असून, परिचारिकांना आॅनलाइन नोंदणी करणे शक्य असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले. आता नोंदणीसाठी १५ दिवस लागतात, पण हे काम एका दिवसात होईल, असे आश्वासन माळी यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमात परिचारिकांच्याक कार्याविषयी जनजागृती करणाऱ्या ‘जाणीव’ नावाच्या माहितीपटाचे स्क्रीनिंग झाले, स्मार्ट कार्डविषयी माहिती देण्याऱ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)