जितेंद्र कालेकर, ठाणेनर्सिंगच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी पूनम जगन्नाथ खरात (२०) हिच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालक (शुश्रूषा) पी.बी. भोई यांनी परिचारिकांच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली.पूनमच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे. पूनम, महेश आणि पूजा या तीन भावंडांमध्ये ती मोठी. धाकटी बहीण पूजा दहावीला आहे. पहिल्या वर्षापासून विशेष गुणवत्ता श्रेणीत ती उत्तीर्ण झाली होती. तिचा परिचारिकेचा साडेतीन वर्षांचा कोर्स जानेवारीत पूर्ण होणार होता, अशी माहिती अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेला तिचा भाऊ महेशने दिली. शुक्रवारी रात्री ७.१५ वा. घडलेल्या या घटनेची माहिती वसतिगृहातून पावणेनऊ वाजता कुटुंबीयांना सांगण्यात आली. त्याआधी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून ही घटना समजली. मग, जिल्हा रुग्णालय किंवा वसतिगृहाच्या प्रमुखांनी का कळविले नाही, असा सवाल तिचे वडील जगन्नाथ यांनी उपस्थित केला. वसतिगृह आणि जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर खरात कुटुंबीयांनी रोष व्यक्त केल्यामुळे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात तिच्या शवविच्छेदनाचा निर्णय ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप बोरस्ते यांनी घेतला. दरम्यान, पूनमचा मृत्यू झालेल्या खोलीत ‘लिग्नोकेन डूपरसेन’ हे भूल देण्यासाठीचे इंजेक्शन मिळाले. सिरिंजमध्ये काही प्रमाणात भरलेले इंजेक्शनही मिळाले. पूनमच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला इंजेक्शन देण्यात आल्याच्या खुणा आढळून आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नदाफ यांनी दिली. या इंजेक्शनचा उपयोग भूल देण्यासाठी केला जातो. पण, ते घेतले गेले तर कार्डिअॅक अॅटॅकही येऊ शकतो, असे जिल्हा रुग्णालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. एस.पी. बाबुळगावकर यांनी सांगितले.
परिचारिकेच्या मृत्यूची चौकशी
By admin | Published: November 24, 2014 1:12 AM