‘जेजे’तील नर्सिंग इन्स्टिट्यूट डीनना आंदण; राज्यभरातून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:02 AM2023-02-17T06:02:42+5:302023-02-17T06:03:14+5:30

सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध

Nursing institute dean in 'JJ' protested across the state | ‘जेजे’तील नर्सिंग इन्स्टिट्यूट डीनना आंदण; राज्यभरातून विरोध

‘जेजे’तील नर्सिंग इन्स्टिट्यूट डीनना आंदण; राज्यभरातून विरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : गेल्या सहा दशकांपासून जे. जे. रुग्णालय परिसरात मानाने उभी असलेली आणि अनेक परिचारिकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी परिचर्या शिक्षण या स्वतंत्र संस्थेचा ताबा जे. जे.च्या अधिष्ठात्यांना (डीन) देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले असून, नर्सिंग क्षेत्रातील सर्व संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

नर्सिंग क्षेत्रातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी दीपस्तंभ संस्था असा लौकिक परिचर्या शिक्षण संस्थेचा आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतून प्रशिक्षित होऊन आज अनेक परिचारिका देश-परदेशात कार्यरत आहेत. स्थापनेपासूनच या संस्थेचा कारभार स्वतंत्र आहे. संस्थेच्या प्राचार्य याच संस्थेच्या प्रमुख. वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाचे नियंत्रण असले तरी आपले स्वतंत्र अस्तित्व संस्था टिकवून आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशासकीय कारभार ही जबाबदारी संस्था स्वतंत्रपणे सांभाळत होती. तसेच शिक्षकांना निवासाची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना हॉस्टेल त्यांच्या अखत्यारीतील इमारतीत करून देण्याचे सर्व अधिकार हे प्राचार्यांकडे होते. मात्र, गेल्या आठवड्यात ही संस्था डीनच्या ताब्या देण्याचा शासन निर्णय झाला. त्यामुळे संस्थेच्या प्राध्यापकांत खळबळ उडाली आहे. सर्वच नर्सिंग संघटनांनी या निर्णयाविरोधात सह्यांची मोहीम उघडली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भातील पत्र दिले जाणार आहे. 

राज्यातील एकमेव...
राज्यात एकूण सहा परिचर्या शिक्षण संस्था असून, त्यापैकी पाच संस्थांवर अधिष्ठात्यांचे नियंत्रण आहे. मुंबईतील ही एकमेव संस्था स्वतंत्रपणे काम करीत होती. प्रशाकीय कामात विलंब होऊ नये यासाठी तिचा ताबा अधिष्ठात्यांकडे देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे.  

इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमानुसार परिचर्या शिक्षण संस्थेचे प्रमुख या प्राचार्य असतात. ६० वर्षे ही संस्था व्यवस्थित कारभार करीत आहे. अशा पद्धतीने संस्था अधिष्ठात्यांच्या ताब्यात देणे म्हणजे आम्ही काम करायला कमी पडत असल्याचा संदेश आहे. हे अनाकलनीय आहे. 
- डॉ. नीलिमा सोनावणे, प्राचार्य, परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई

मी स्वतः या संस्थेची विद्यार्थिनी आहे, ही संस्था आम्हा सर्वांची अस्मिता आहे. नर्सिंग क्षेत्रांतील व्यक्ती या संस्थेची प्रमुख आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सनदशीर पद्धतीने या निर्णयाला विरोध करीत आहोत. वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठांना भेटून आम्ही आमचे निवदेन देत आहोत. राज्यातील बहुतेक नर्सिंग संघटनांनी या निर्णयाला विरोध देणारे पत्र आमच्याकडे पाठविले आहेत. 
    - हेमलता गजबे, राज्य उपाध्यक्ष, राज्य परिचारिका संघटना 

Web Title: Nursing institute dean in 'JJ' protested across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई