नुस्ली वाडिया यांना याचिका करण्यास मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:19 AM2018-08-10T05:19:27+5:302018-08-10T05:19:41+5:30
मोहम्मद अली जीना यांच्या बंगल्याच्या मालकी हक्कासाठी मुलगी दिना वाडिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली.
मुंबई : मोहम्मद अली जीना यांच्या बंगल्याच्या मालकी हक्कासाठी मुलगी दिना वाडिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. दिना यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा व वाडिया समूहाचे अध्यक्ष नुस्ली वाडिया यांनी याचिका चालविण्याची तयारी दर्शवली. आईऐवजी आपले नाव याचिकाकर्ते म्हणून लावाावे, अशी विनंती त्यांनी केली. उच्च न्यायालयाने नुस्ली वाडिया यांना दिना वाडिया यांचे नाव हटवून त्यांचे नाव घालण्यास परवानगी दिली.
मलबार हिल येथे मोहम्मद अली जीना यांचा बंगला आहे. त्याच्या मालकी हक्कावरून दिना वाडिया आणि केंद्र सरकारमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. मोहम्मद अली जीना यांची मुलगी या नात्याने व त्यांची एकुलती एक कायदेशीर वारस म्हणून आपल्याला बंगल्याचा ताबा द्यावा, अशी विनंती दिना वाडिया यांनी याचिकेद्वारे केली. २ नोव्हेंबर २०१७ रोजी दिना वाडिया यांचे निधन झाले. त्यांच्याऐवजी आपले नाव घालावे, यासाठी दिना वाडिया यांचे पुत्र नुस्ली यांनी न्यायालयात याचिका केली. मात्र, केंद्राने याचिकेला विरोध केला.
नुस्ली वाडिया यांनी आईचे मृत्युपत्र दाखविले. त्यात आईने नुस्ली यांना संपत्तीचे अंमलदार जाहीर केले आहे. मात्र आईच्या मृत्युपत्राबाबत उच्च न्यायालयाकडून प्रमाणपत्र घेतले नसल्याचे याचिकाकर्ते होण्याचा नुस्ली यांना अधिकार नाही, असे केंद्राचे वकील अद्वैत सेठना यांनी सांगितले. न्यायालयाने या मुद्द्यावर सुनावणीदरम्यान युक्तिवाद करण्याचे निर्देश देत नुस्ली वाडिया यांना दिलासा दिला.