Join us  

नूतनजी चिरकाल स्मरणात राहतील

By admin | Published: February 22, 2016 3:21 AM

प्रख्यात सिनेअभिनेत्री नूतन यांच्या २१ फेब्रुवारी रोजी असलेल्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच सुप्रसिद्ध लेखिका ललिता ताम्हाणे लिखित ‘नूतन असेन मी... नसेन मी...’ या पुस्तकाच्या

मुंबई : प्रख्यात सिनेअभिनेत्री नूतन यांच्या २१ फेब्रुवारी रोजी असलेल्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच सुप्रसिद्ध लेखिका ललिता ताम्हाणे लिखित ‘नूतन असेन मी... नसेन मी...’ या पुस्तकाच्या चौथ्या आणि सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते पार पडला. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री झालेल्या या समारंभाला हिंदी, मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रत्येकानेच एक सहृदय व्यक्ती म्हणून नूतनजी चिरकाल स्मरणात राहतील, असे उद्गार काढले.या प्रकाशन समारंभावेळी बोलताना माधुरी म्हणाली, ‘नूतनजींबद्दल एक कायम मनात राहणारी भावना म्हणजे त्या खूप प्रेमळ होत्या. त्यांच्याबरोबर ‘मुजरीम’ या चित्रपटात मी काम केले. त्यात त्या आईचा रोल करत होत्या. सेटवर त्या आल्या तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कुतूहल होते. पण त्या अगदी साध्या, सिम्पल होत्या. स्वत:ची छत्री त्यांनी स्वत:च धरली होती. अशा या अभिनेत्रीने माझ्यावर खूप छाप पाडली. त्यांच्यासारखेच आयुष्यात अगदी साधी राहणीमान ठेवायचे असे मी त्याचवेळी ठरवून टाकले.’माधुरी म्हणाली, ‘त्या एवढ्या प्रेमळ होत्या की त्यांनी माझ्या आई-वडिलांबद्दल विचारपूस केली. आई क्लासिकल गाणे म्हणते असे सांगितल्यावर, त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटली आणि काही रचना, राग यांच्याबद्दल तब्बल एक तास गप्पा मारल्या. काही रचना ऐकून दाखवल्या. या पुस्तकातून ललिता ताम्हाणे यांनी कोणताही मसाला न लावता, तडका न मारता, नूतनजी जशा होत्या तशा सुरेखपणे साकारल्या आहेत.’लेखिका ललिता ताम्हाणे यांनी या वेळी म्हटले की, ‘या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००९मध्ये आली आणि आज नूतनजींच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त चौथी आवृत्ती येते आहे. नूतनजी जाऊन आज २५ वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही. मी या सुधारित आवृत्तीत माझ्याकडे असलेल्या नूतनजींबद्दलच्या सर्वच्या सर्व आठवणी देऊन टाकल्या आहेत.’ या वेळी ‘चांद फिर निकला’ या अभिनेत्री नूतनवर चित्रित झालेल्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)