मुंबईतील दोन हजार कुपोषित बालकांचे काँग्रेसतर्फे पोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:08 AM2021-08-18T04:08:47+5:302021-08-18T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील एक हजार कुपोषित बालकांना दत्तक घेण्याची घोषणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील एक हजार कुपोषित बालकांना दत्तक घेण्याची घोषणा मुंबई काँग्रेसने केली होती. या बालकांना पौष्टिक आहार, योग्य औषधोपचारांद्वारे सुदृढ करण्याचा संकल्प पक्षाने सोडला होता. या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. येत्या २० ऑगस्टला माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी १२२४ कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्याचा प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
कुपोषित बालकांना दत्तक घेण्यासाठी राज्याच्या महिला बालविकास विभागातर्फे ७७ केंद्रे उघडली जाणार आहेत. या केंद्रांमध्ये कुपोषित बालकांची तपासणी होईल. त्यातील ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातील. तसेच ज्यांना सकस आहाराची गरज आहे, अशा कुपोषित बालकांना आवश्यक प्रथिने, व्हिटॅमिन्स, कॅल्शियमच्या गोळ्या, सकस आहार, टॉनिक आणि औषधे मुंबई काँग्रेसतर्फे घरपोच दिली जाणार आहेत. या बालकांचे योग्य संगोपन व्हावे, यासाठी दहा कुपोषित बालकांमागे एक महिला समन्वयक अशा पद्धतीने शंभर महिला समन्वयकांची निवड करण्यात आल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, अणुशक्तीनगर, चेंबूर, मुलुंड, शिवाजीनगर व ट्रॉम्बे विभागातील ही कुपोषित बालके आहेत. तसेच या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड प्रत्येकी पाचशे कुपोषित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.