पोषण आहारातूनच मोखाड्यात कुपोषण’
By admin | Published: July 4, 2015 11:19 PM2015-07-04T23:19:49+5:302015-07-04T23:19:49+5:30
सडलेला तांदुळ, मुदतबाह्य घटकांचा होणारा पुरवठा निकृष्ट सामग्री ती सुद्धा वेळेवर न पोहचवणे, यामुळे या पोषण आहारातून आदिवासी विद्यार्थ्यांचे
मोखाडा : सडलेला तांदुळ, मुदतबाह्य घटकांचा होणारा पुरवठा निकृष्ट सामग्री ती सुद्धा वेळेवर न पोहचवणे, यामुळे या पोषण आहारातून आदिवासी विद्यार्थ्यांचे पोषण होते की कुपोषण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळा १५० आहेत. व या शाळांमध्ये १२ हजारच्या आसपास मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना मध्यान्ह भोजनासाठी पोषण आहाराचा पुरवठा ठेकेदाराच्या मार्फत केला जातो.
मात्र ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे शालेयपोषण आहारातून पुरवल्या जाणाऱ्या वस्तू तांदूळ, मसूर डाळ, तूरडाळ, साखर, गूळ, हरभरा, चवळी, मटकी, मूग, वाटाणा, मोहरी, जीरी, मिरची पावडर, हळद, आयोडीनयुक्त मीठ, सोयाबीन तेल, मसाल्याचे पदार्थ इत्यादीचा निकृष्ट मुदत बाह्यपुरवले जात असल्याने त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होते आहे.
तालुक्यातील धामणशेत जि.प. शाळेवर पोषण आहाराचा पुरवठा झाला नसल्याने उसने- पासने घेऊन माध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्याची वेळ येथील शिक्षकांवर आली आहे. यामुळे येथील गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मूळात कारभार भ्रष्ट आणि तरीदेखील या मुजोर ठेकेदारावर कारवाई नाही ही स्थिती कधी बदलणार? असा सवाल येथील जनता प्रशासनाला विचारते आहे. (वार्ताहर)
कधी होणार कारवाई ?
शालेय पोषण आहार पुरवठ्यामध्ये संबंधीत ठेकेदाराने मुदतीत पुरवठा न केल्यास मालाची किंमत १ लाखापेक्षा कमी असेल तर अशा किमतीच्या ५ टक्के दंड आकारल्यास येतो.
खाण्यास अयोग्य नसेल असा माल पुरविल्यास त्याच्या किंमतीच्या ३ टक्के किंवा २० हजार रुपये यापैकी जी जास्स्त असेल तेवढा दंड करण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहे. त्याचा वापर कधीच होत नाही.