सीमा महांगडेमुंबई : सप्टेंबरचा पहिला आठवडा हा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह (नॅशनल न्यूट्रिशन वीक) म्हणून साजरा केला जात असून, पोषक आहारविषयक जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह पाळला जातो. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवत शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने यंदा विद्यार्थ्यांसाठी पोषण अभ्यासक्रम (न्यूट्रिशन करिक्यूलम) आखला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबरचा संपूर्ण महिना हे विषय विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल या विषयांशी जोडत हसत-खेळत शिकवले जाणार आहेत.
डी. एस. हायस्कूलमध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे धारावी-सायन-चुनाभट्टी परिसरातील कष्टकरी वर्गातील असल्यामुळे त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. शाळेतील लेट्स गेट फिट उपक्रमाच्या प्रमुख आणि श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या अमृता कारखानीस यांनी या पोषण अभ्यासक्रमाची रचना केली आहे.या अभ्यासक्रमांतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना फूड पिरॅमिड, माझ्या ताटातील खाद्यपदार्थ, रंग आणि अन्न, खाद्यपदार्थ बनवण्यातील गंमतीजमती यांची ओळख, तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पोषक आहाराची ओळख, जीवनसत्वांची ओळख, तसेच पोषक आहाराचे स्रोत यांबाबत माहिती दिली जाणार आहे अशी माहिती अमृता कारखानीस यांनी दिली.