Join us

जेव्हा सत्काराच्या ट्रॉफीतून ड्रग्ज निघते; क्रिसॅन परेराला खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती

By मनीषा म्हात्रे | Published: May 08, 2023 9:14 AM

मुंबई पोलिसांच्या प्रयत्नामुळे अभिनेत्रीची शारजाह जेलमधून सुटका झाली मात्र तिच्यासारखेच आणखी चार जणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते.

मनीषा म्हात्रे

मुंबई :  श्वान भुंकला म्हणून बदला घेण्यासाठी बोरीवलीतील बेकर्सने ‘सडक २’, ‘बाटला हाऊस’मध्ये काम केलेल्या अभिनेत्री क्रिसॅन परेराला हॉलिवूड वेब सीरिजच्या ऑडिशनच्या नावाखाली ‘गुमराह’ चित्रपटासारखे खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेने सर्वानाच हादरून सोडले. अभिनेत्रीला दिलेल्या ट्रॉफीतून गांजा पाठविण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नामुळे अभिनेत्रीची शारजाह जेलमधून सुटका झाली मात्र तिच्यासारखेच आणखी चार जणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते.

गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने मास्टरमाईंड ॲन्थोनी पॉल (३५) आणि राजेश बोभाटे ऊर्फ रवी या दोघांना अटक केली. बोरीवली परिसरात तक्रारदार प्रेमिला परेरा राहतात. त्या रियल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांची मुलगी क्रिसॅन (२७) ही हिंदी नाटक, चित्रपट व वेब सिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते. रवी भारत आणि दुबईत आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहयोग करीत असून तो वेब सिरीज गुंतवणूकदार असल्याचे सांगून मायलेकींना जाळ्यात ओढले. त्याने, हॉलिवूड वेब सिरीजसाठी दुबई येथे एक दिवसासाठी ऑडिशनसाठी नेत असल्याचे सांगत  मुलीला दुबईऐवजी शारजाह येथे नेले. तेथे तिला दिलेल्या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज सापडल्याने तेथील पोलिसांनी तिला ताब्यात घेत अटक केली होती. अँथोनी पॉल हा  प्रेमिला यांचा व्यावसायिक भागीदार होता. व्यावसायिक वादातूनही त्याने असे काही केले का? या दिशेनेही तपास सुरू आहे. तसेच त्याने हे ड्रग्ज कुणाकडून आणले याटाही पोलिस तपास करत आहेत.

श्वान भुंकला म्हणून थेट...

गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान प्रेमिला यांचा पाळीव श्वान पॉलवर भुंकला आणि त्याला चावण्याचा प्रयत्न केला. पॉलने त्यांच्या श्वानाला मारण्यासाठी खुर्ची उचलली. प्रेमिला यांना राग आला, त्यांनी त्याला सुनावले. सर्वांसमोर पॉलचा अपमान झाला. याच रागातून त्याने बदला घेण्याचे ठरविल्याचेही समोर आले.

पॉल कोण आहे?

मीरा रोडचा रहिवासी असलेला पॉल हा मालाड, बोरीवली भागात बेकरी चालवतो. तर रवी हा कोकणातील रहिवासी असून एका बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. पॉलची बहीण प्रेमिला यांच्या इमारतीत राहते.

पहाटे २.३० 

शारजाह येथे उतरल्यानंतर क्रिसॅनने कॉल करून रवीने फसवणूक केल्याचे सांगितले.

पहाटे ६.४५ 

प्रेमिला पॉलने सगळी माहिती देताच त्याने तरुणीची सर्व कागदपत्रे व्हॉट्सॲप घेत माहिती घेत असल्याचे सांगितले.

दुपारी १२.३० 

मुलीला ड्रग्ज केसमध्ये अटक झाली.

सायंकाळी ४ वा.

मुलीला सोडविण्यासाठी ८० लाख खर्च येईल सांगून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला.