‘ऐ दिल है मुश्किल’पासून प्रेक्षक दूरच!
By admin | Published: October 29, 2016 03:31 AM2016-10-29T03:31:19+5:302016-10-29T03:31:19+5:30
करण जोहरचा बहुप्रतिक्षित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित झाला खरा पण बॉक्स आॅफिसवर अपेक्षित परिणाम साधू शकला नाही.
मुंबई : करण जोहरचा बहुप्रतिक्षित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित झाला खरा पण बॉक्स आॅफिसवर अपेक्षित परिणाम साधू शकला नाही. या चित्रपटातील फवाद खान या पाकिस्तानी कलाकारावरून जोरदार राजकीय विरोध झाला होता. याचा लाभ चित्रपटाला होईल व चांगली ओपनिंग मिळेल, असा कयास लावला जात होता. परंतु सोशल मीडियावर आज या चित्रपटाला घेऊन जो ट्रेंड समोर आला त्यावरून या चित्रपटाला मिळालेला अल्प प्रतिसाद आणखी ठळकपणे अधोरेखित झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उरी सैन्य शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध बिगुल फुंकले. यापुढे ज्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार काम करतील तो चित्रपट प्रदर्शितच होऊ देणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली होती. यानंतर करण जोहरची प्रतिक्रिया आली. भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवणार नाही, अशी हमी त्याने दिली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि राज ठाकरेंनी विरोध मागे घेताच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
या सर्व घटनाक्रमात एक गोष्ट मात्र आश्चर्यकारक ही आहे की प्रेक्षक स्वत:च हा चित्रपट पाहायचे टाळत आहेत. अनेक प्रेक्षकांनी व्टिट्रवर पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावरील या विरोधांच्या स्वराचा अर्थ असा आहे की प्रेक्षकांनी या चित्रपटावर अघोषित बहिष्कार घातला आहे. आज व्टिट्रवर प्रेक्षकांनी ‘ऐ दिल है मुश्किल’बाबत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका व्टिट्मध्ये लिहिले होते, हा चित्रपट बघून आपला पैसे उगाच खर्च करू नका. दुसऱ्या एका व्टिट्मध्ये एक प्रेक्षक म्हणतो, या चित्रपटाला घेऊन जो राजकीय वाद झाला त्याचे करणने आभार मानले पाहिजे. कारण, या चित्रपटात पाहण्यासारखे काहीच नाही. चित्रपटाचा मुख्य उद्देशच
प्रेक्षकांचे मनोरंजन हा असला पाहिजे. परंतु या चित्रपटात त्याचाच अभाव असल्याने काहींना हा चित्रपट आवडतोय तर काहींनी याला साफ नाकारले आहे.