ओबीसी शिष्टमंडळाला हवी मुख्यमंत्र्यांची भेट
By admin | Published: January 12, 2017 06:38 AM2017-01-12T06:38:42+5:302017-01-12T06:38:42+5:30
राज्य मागासवर्ग आयोगावर अध्यक्ष म्हणून निवडलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एस.बी. म्हसे पाटील यांची हकालपट्टीची
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगावर अध्यक्ष म्हणून निवडलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एस.बी. म्हसे पाटील यांची हकालपट्टीची मागणी करत ओबीसी जनक्रांती परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, म्हणून परिषदेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले की, पाटील यांच्यासह त्यांच्या परिवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे पाटील हे मागासवर्गीय नसल्याने समाजामधून त्यांच्या नावाला विरोध होत आहे. याशिवाय आयोगातील इतर मराठा समाजाच्या सदस्यांच्या निवडीमुळे समाजात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. यावर कायद्यानुसार समाजशास्त्रज्ञ म्हणून सरकारने आयोगावर मराठा समाजाच्या एका गणिताच्या प्राध्यापक सदस्याची निवड केलेली आहे.
तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या सदस्यालाही सरकारने नियुक्ती दिलेली आहे. परिणामी, या विविध मुद्द्यांसंदर्भात समाजाचे मत मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला वेळ देण्याची मागणी महाजन यांनी केली आहे. (प्रतिनिधी)