मुंबई - आरक्षणाच्या नावाखाली सर्व समाजांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसींचे जे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. तुम्ही मंडलबरोबर नाही, कमंडलबरोबर आहात. मग ते छगन भुजबळ असतील किंवा शेंडगे असतील. आरक्षण हा काही विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आज जे आरक्षणवादी आहेत ते आरक्षण विरोधी आहेत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या संविधान सन्मान महासभेत केला.
ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे. शासनाच्या धोरणामुळे प्रत्येकाला असे वाटते की, आरक्षण मिळाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
सभेला माेठी गर्दी झाली हाेती. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली इतर कार्यक्रमांबरोबर संविधान बदलले जावे की न जावे याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मात्र निवडणुकीअगोदर या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येथे येऊन गेले. त्यांना माझा आग्रह की काँग्रेसने दुसऱ्या राज्यात संविधानासंदर्भात चर्चा करावी. पब्लिक मिटिंग घ्यावी. माझा सवाल आहे की, संविधान बदलण्याची गरज काय आणि बदलणार असाल तर नवीन काय येणार? पण ते सांगायची तयारी नाही. फक्त एवढेच सांगितले जाते की संविधान जुने झाले आहे. संविधान ही राज्य चालविण्याची व्यवस्था आहे. लोकशाहीऐवजी तुम्ही ठोकशाही आणणार आहात का? आणि त्या ठोकशाहीचा आराखडा काय असणार? मग ती संसदीय लोकशाही असणार की अध्यक्षीय लोकशाही असणार याची तरी चर्चा करा, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
मोहन भागवत अखंड भारत संकल्पना मांडतात. मग काय आहे ती संकल्पना?, असाही सवाल त्यांनी केला. आजच्या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. मागणी करायला संधी आहे, असा विश्वास आहे. हा विश्वास जर तुटला तर आता आपल्याला दिसतंय काय होणार काय नाही, हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. आगामी निवडणूक आरक्षणाच्या चर्चेशिवाय शक्य नाही. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई लढावीच लागेल. पण येत्या तीन डिसेंबरनंतर राजकारणाचे उग्र स्वरूप पाहायला मिळेल, असा धोकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
...म्हणून राहुल गांधी आले नाहीत - पटाेले- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महासभेचे आमंत्रण दिले होते; पण विधानसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी तसे पत्रही त्यांना दिले असून राहुल गांधी यांनी वंचितच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात.- संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे हा पवित्र ग्रंथ न मानणाऱ्यांना व तो बदलू पाहणाऱ्या भाजपाला आता धडा शिकवण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.