मुंबई- महाराष्ट्र भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकारविरुद्ध व ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज उत्तर मुंबईत दहिसर पूर्व, चेक नाका येथे आंदोलन करण्यात आले. आज सकाळी १०:३० पासून सुरू झालेल्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उत्तर मुंबईचे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर या चक्काजाम आंदोलनाने दहिसर चेकनाक्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
"आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करून ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी, सामाजिक समानता, न्याय आणि बंधुत्व अबाधित राखण्यासाठी चक्काजाम आंदोलनाला ही तर सुरुवात आहे," असे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या प्रसंगी केले. आरक्षण मिळेपर्यंत भाजप वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मनीषा चौधरी यांनी सरकारने एम्पिरिकल डेटा लगेच तयार करावा आणि सादर करावा असे सांगितले. तर आमदार अमित साटम यांनी वर्तमान महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण समाजाने गमविले असून आम्ही याचा धिक्कार करीत असून आता भाजप शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.