मुंबई : स्थूलत्व फक्त मोठ्या माणसातच असते, असे नाही तर पौगंडावस्थेतही असते. अगदी जन्मल्या अवस्थेत ही बाळे आपले स्थूलत्व दाखवतात. जशी ही बाळे वयाने वाढतात तसेच त्यांचे स्थूलत्व वाढते. मांड्या, दंड, पोटऱ्यांमध्ये अतिप्रमाणात चरबीमुळे वाढलेले असते. ही मुले थुलथुलीत, गुबगुबीत अशी दिसतात. लवकर थकतात. त्यांचा स्टॅमिना कमी असतो. सुखवस्तू घरातील मुले अशी असतात. या स्थूलत्वामुळे ही मुले सहज विविध आजारांचे बळी होतात़ लहान मुलांच्या स्थूलत्वाची समस्या दिवसागणिक गंभीर होतेय, अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.फक्त शारीरिक जाडीवरून स्थूलता व तिचे योग्य मापन होत नाही. बीएमआय हा सार्वत्रिक वापरला जाणारा निकष असला तरी लहान मुले, किशोरवयीन मुले-मुली, स्त्रिया यांच्यासाठी स्थूलतेच्या इतर निकषांकडेही पाहणे गरजेचे आहे, असे मत बेरिअॅट्रीक सर्जन डॉ. रजनीश शहा यांनी मांडले.स्थूल व्यक्ती कोण हे साधारणत: नजरेने समजत असले तरी जाड दिसणारी प्रत्येक व्यक्ती स्थूल असेलच असे नाही. एखादा पहेलवान, व्यायामपटूसारख्या व्यक्ती स्थूल वाटू शकतात. त्यामुळेच नेमके किती जाड म्हणजे स्थूल हे शास्त्रीय पद्धतीने निश्चित करणे गरजेचे असते व त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूल व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे, हेदेखील अगदी खरे असल्याचे डॉ. नैतिका सेन यांनी सांगितले.डॉ. सेन यांनी सांगितले की, लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण गेल्या वीस वर्षांत दहापटीने वाढले आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे.पूर्वी मुले दिवसभरात काही तास खेळायची़ त्यामुळे शारीरिक हालचाल होत असे. आता मैदानी खेळ हरवलेच असल्याने मूल घरात किंवा शाळेत बसूनच असते. शारीरिक हालचाल किंवा व्यायाम होत नाही. जंकफूड किंवा रेडी ईट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने मुले स्थूल होण्याकडे कल वाढत आहे. सर्वसाधारणपणे मुलांमधील स्थूलतेचे दोन भाग असतात. दहा वर्षांखालील मुलांना शक्यतो आनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर त्यावरील मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लठ्ठपणा येतो.जीवनशैलीकडे द्या लक्ष- सातत्याने जंकफूड खाणे, मोबाइल, व्हिडीओ गेम यांमुळे कमीत कमी शारीरिक हालचाल यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो.- दहा वर्षांवरील मुलांमध्ये दिसून येणारा हा लठ्ठपणा वेळीच लक्षात आल्यास आहार किंवा व्यायामाच्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. परंतु वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास मात्र शस्त्रक्रिया करणे भाग असते.स्थूलतेची लक्षणे : मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १५ किलो वजन अधिक असणे म्हणजे मूल स्थूलतेकडे झुकत आहे, असे म्हणता येईल. घरी बसल्या बसल्याही हालचाली संथ होणे, मैदानी खेळ न खेळणे, वजन सतत वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे ही साधारण लक्षणे मुलांमध्ये दिसून येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.हे आहेत उपचार- आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गाने वजन कमी करता येते. पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये शक्यतो बॅरिअॅटिक शस्त्रक्रिया करणे टाळले जाते. अशा बालकांमध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शक्यतो आहार आणि व्यायामावरच भर दिला जातो.- लठ्ठपणावर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. आनुवंशिकतेने लठ्ठपणा आला आहे का याच्या चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. दहा वर्षांवरील मुलांमध्ये मात्र लठ्ठपणा वाढतच असेल आणि शरीराला त्रासदायक होत असल्यास शस्त्रक्रिया करून अतिरिक्त चरबी काढली जाते. शक्यतो ही शस्त्रक्रिया एकदाच करावी लागते.
लहानग्यांमधील स्थूलत्वाची समस्या दिवसागणिक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:31 AM