मुलांमध्ये वाढत आहे स्थूलतेचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:09 AM2021-09-04T04:09:02+5:302021-09-04T04:09:02+5:30
मुंबई : कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या कारणामुळे तसेच लॉकडाऊनमध्ये मैदाने, बागा बंद असल्यामुळे लहान मुलांचे शाळेत जाणे, बागेत ...
मुंबई : कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या कारणामुळे तसेच लॉकडाऊनमध्ये मैदाने, बागा बंद असल्यामुळे लहान मुलांचे शाळेत जाणे, बागेत फिरणे बंद झाले आहे. यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलता वाढू लागली आहे. इनडोअर गेम्स तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे घरी बसणे अधिक प्रमाणात झाले आहे, त्यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलता वाढू लागली आहे.
* शहरात स्थूलता ही नवीन समस्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत तसेच खेळाचीही मैदाने बंद आहेत. त्यामुळे मोबाईल गेम्स तसेच इनडोअर गेम्सकडे मुलांचा ओढा वाढलेला आहे. मुले मोबाईलला अधिक महत्त्व देऊ लागल्यामुळे स्थूलतेचे प्रमाण अधिक वाढले आहे.
* काय आहेत कारणे
लॉकडाऊनपासून लहान मुलांचे खेळणे, बाहेर जाणे, सायकल चालवणे इत्यादी बंद झाले आहे. कोरोनाच्या काळामध्ये मुले घरातून बाहेत पडत नाहीत. तसेच शहरामध्ये तर मुले घरीच बसून आहेत. मुले शरिरावाटे कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत. तसेच सर्वात महत्त्वाचे मुलांचे जंक फूड खाण्याचे तसेच तेलकट, आंबट खाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याच कारणामुळे मुलांमधील स्थूलता प्रामुख्याने वाढत आहे.
*काय म्हणतात बालरोगतज्ज्ञ
मुलांच्या शारीरिक हालचाली बंद झाल्या आहेत, त्यामुळे ज्या कॅलरीज बर्न व्हायला हव्यात त्या बर्न होत नाहीत. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे जेवण वेळेवर होत नाही, त्यामुळे अधिक कॅलरी वाढतात. त्यामुळे मूल स्थूल होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
- चिरंजीव सखरानी ( बालरोगतज्ज्ञ)
* पालक म्हणतात -
सध्या कोरोना काळ असल्याने लॉकडाऊन आहे. मात्र मुले मोबाईललाच चिकटून बसलेली असतात. मोबाईल गेम आणि इंटरनेट या गोष्टींसाठी मुलांचा हट्ट असतो. मात्र जेवताना, खातानासुद्धा मोबाईल लागतो. त्यामुळे ही गोष्ट काळजी करण्यासारखी आहे.
- अभय अपरार (पालक)