Join us

लठ्ठपणा, हातावरील टॅटूमुळे लुटारू महिला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

लसीकरणाच्या नावाखालील वृद्ध महिलेच्या लुटीचा उलगडालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसीकरणाच्या नावाखाली घरात घुसून वृद्ध महिलेला चाकूच्या ...

लसीकरणाच्या नावाखालील वृद्ध महिलेच्या लुटीचा उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसीकरणाच्या नावाखाली घरात घुसून वृद्ध महिलेला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास अखेर वरळी पोलिसांना यश आले. हाती कुठलेही पुरावे नसताना केवळ लठ्ठपणा आणि हातावरील टॅटूच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच इमारतीत राहणाऱ्या दीपाली म्हात्रेला या प्रकरणी अटक केली.

वरळी नाका येथील गोपचर सोसायटीत मेच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सत्तर वर्षांच्या वृद्ध महिला नऊ वर्षांच्या नातवासोबत घरात असताना, लुटारू महिला लसीकरणाची माहिती विचारण्याच्या बहाण्याने घरात घुसली. तुमचे लसीकरण झाले का, याची विचारणा केली.

पुढे, तहान लागल्याचा बहाणा केला. वृद्ध महिला पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाताच दरवाजा लावून तिने चाकूचा धाक दाखवत नातवाला आणि आजीला बांधून ठेवले. आरडाओरडा करू नये म्हणून त्यांच्या तोंडात रूमाल कोंबला. त्यानंतर घरातल्या तब्बल तीन लाख रुपये किमतीच्या ऐवजावर हात साफ करत पळ काढला. घटनेची वर्दी मिळताच वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

आजीकडून मिळालेल्या माहितीत लुटारू महिला लठ्ठ होती, तसेच तिच्या हातावर टॅटू असल्याचे पाेलिसांना समजले. हाच धागा पकडून तपास सुरू असताना, आजी राहत असलेल्या इमारतीत राहणारी दीपाली आरोपी मिळाला का? तपासाचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी सतत येत होती. पोलिसांचे लक्ष तिच्या हातावरील टॅटूकडे गेले. दीपाली अंगाने जाडी असल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेत, उलटतपासणी सुरू केली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिला अटक करत, वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

..................................