Join us  

राहुल गांधी यांच्या सभेला ट्रॅफिक पोलिसांचे रेड कार्ड, संभाव्य ट्रॅफिक जाममुळे नोंदविला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 9:16 AM

वाहतूक कोडींवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने मागील आठवड्यात वाहतूक पोलिसांनी एक बैठकदेखील घेतली होती.

मुंबई :  विरोधी पक्षनेते राहुल गांधी  यांच्या २० ऑगस्ट रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) होणाऱ्या सभेला आता वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. सध्या सायन पूल बंद असल्याने सायन-बीकेसी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच राहुल गांधी यांची सभा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी होणार असल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडेल, असा  आक्षेप वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे नोंदवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

सायन रेल्वे मार्गावरील पूल नव्याने बांधण्यासाठी १ ऑगस्टपासून यावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मध्य  मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला. येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामामुळे रस्त्यांवरील मार्गिका याआधीच बंद ठेवण्यात आल्या आहेत. हे काम जसजसे पूर्ण होत जाईल तसतसे बॅरिकेट्स काढून तो मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करत जावा, अशी सूचना मेट्रोच्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. 

दरम्यान, वाहतूक कोडींवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने मागील आठवड्यात वाहतूक पोलिसांनी एक बैठकदेखील घेतली होती. आता विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईत सभेसाठी येत आहेत. अशा परिस्थितीत बीकेसी तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत आणखी भर पडेल, अशी चिंता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

परवानगी नाकारण्याचा अधिकार पोलिसांकडेसभेला परवानगी नाकारण्याचा अधिकार एमएमआरडीएला नाही, असे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एमएमआरडीए कोणत्याही पक्षाला किंवा खासगी संस्थेला  कार्यक्रमासाठी मैदान भाड्याने देते. कोणत्याही प्रकरणात आमची एवढीच भूमिका असते. एखाद्या कार्यक्रमाला परवानगी द्यायची की नाही याचा  निर्णय पोलिस, वाहतूक पोलिस उपनगर जिल्हाधिकारी घेतात. या यंत्रणांनी  परवानगी नाकारल्यास कोणताही कार्यक्रम होण्याचा प्रश्नच येत नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

महायुती  घाबरली आहे. सत्ता जाते आहे, हे पाहून निवडणूक पुढे ढकलत आहेत. आता राहुल गांधी आले तर  वातावरण महायुतीच्या विरोधात जाईल, असे त्यांना वाटते आहे.     - सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

टॅग्स :राहुल गांधीमुंबई