लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या सुनावणीदरम्यान स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने खळबळ उडाली. प्राधिकरणाची वेबप्रणाली १२ आणि १७ तारखेला हॅक करून हा पॉर्न व्हिडीओ चालविल्याचे समोर येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंघ (४८) यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी दोन अनोळखी व्यक्तींविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, १२ तारखेला दुपारी १ वाजून ८ मिनिटे ते १ वाजून ११ मिनिटे यादरम्यान हॅकरने कोर्टाच्या वेबप्रणालीवर पॉर्न क्लिप सुरू केली. या घटनेपाठोपाठ १७ तारखेला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा त्याच नावाने न्यायालयातील स्क्रीनवर ११ मिनिटे पॉर्न क्लिप सुरू झाली.
त्यानंतर, दुसऱ्या नावाच्या व्यक्तीनेही कोर्टाच्या न्यायालयीन वेब प्रणालीमध्ये प्रवेश करून ती हॅक केली. कोर्ट क्रमांक ४ तसेच कोर्ट क्र. ५ मध्ये असलेल्या डिस्प्ले स्क्रीनवर ही चित्रफीत चालवून न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधितांचे आयपी ॲड्रेसही तपासासाठी पोलिसांना देण्यात आले आहे. त्यानुसार कफ परेड पोलिस अधिक तपास करत आहेत.