लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारीसीईटी परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक व मानव हस्तक्षेपरहित परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल पसेंटाइल पद्धतीने घोषित करण्यात आला असून या निकालामध्ये कोणालाही ग्रेस मार्क देण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील आक्षेपांसंदर्भात सीईटी कक्षामार्फत ऑनलाइन आक्षेप नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली होती. आक्षेपांवर तज्ज्ञांकडून पडताळणी उत्तरांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. त्यामुळे 'सीईटी'बाबत घेण्यात आलेले आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
उद्धवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून सीईटी परीक्षेवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आले. औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी-२०२४ ही प्रवेश परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि २ ते १६ मे २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण १६९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा १२ सत्रांमध्ये, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा १८ सत्रांमध्ये घेण्यात आली. परीक्षेस ३ लाख ३०,९८८ विद्यार्थी, ३ लाख ९४ हजार ३३ विद्यार्थिनी व ३१ ट्रान्सजेंडर उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ६ लाख ७५, ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर आदी उपस्थित होते.
आयुक्त काय म्हणतात?प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास ऋण गुण देण्याची पद्धत नाही.निकाल पसेंटाइल पद्धतीने घोषित झालेला आहे.• पालक, परीक्षार्थीच्या आक्षेप किया तक्रारींसाठी सीईटी कक्षामार्फत ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवता येतो.आक्षेपांवर तज्ज्ञांकडून पडताळणी करून उत्तरपत्रिकेत योग्य ते बदल करण्यात आले.• उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार आणि सत्रनिहाय निकाल पर्सटाइल स्वरूपात घोषित करण्यात आला.• सदर परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेऊन एकच गुणवत्तायादी जाहीर करण्यात येते. प्रत्येक बॅचची वेगवेगळी प्रश्नपत्रिका आणि निकाल स्वतंत्रपणे तयार होतो.• २०० पालक / उमेदवार तसेच ई- मेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यात येते.• आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी जे आक्षेप ग्राह्य धरण्यात आलेत अशा ५४ जणांना त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केली जाईल.