Join us

साडेचार कोटी रोजगारांचे उद्दिष्ट

By admin | Published: September 12, 2014 1:26 AM

भारताजवळ असलेल्या तरुणशक्तीचा उपयोग करून औद्योगिक क्षेत्रातील आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र शासनाने कुशल कामगार निर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार केला

कल्याण: भारताजवळ असलेल्या तरुणशक्तीचा उपयोग करून औद्योगिक क्षेत्रातील आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र शासनाने कुशल कामगार निर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार केला आहे. त्याअंतर्गत २०२२ पर्यंत महाराष्ट्रात चार कोटी ५० लाख कुशल कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मात्र, त्यासाठी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून संगणकाशी मैत्री करणे आवश्यक आहे, असे कल्याण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जी.एस. निकम यांनी गुरुवारी येथे सांगितले. यासाठी मुलाखतीचे तंत्र, आरोग्य, कामातील कुशलता तरुणांनी आत्मसात केली पाहिजे, असेही ते म्हणाले. येथील सुभेदारवाडा हायस्कूलच्या शतकोत्तर कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब कल्याण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते़ शालेय शिक्षण समितीचे पंडितराव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माहिती, प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक जी.एम. म्हातनकर, रोटरीचे गणेश जाधव, सुभेदारवाडा शतकोत्तर समितीचे अध्यक्ष वसंतराव काणे, सी.एम. पुराणिक, मुख्याध्यापक बी.टी. सातपुते वगैरे मंचावर होते.ठाणे जिल्ह्यातील विविध उद्योग व शैक्षणिक संस्था, औद्योगिक केंद्रे यामध्ये समन्वय साधावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे चौगुले यांनी सांगितले. आजच्या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, रुग्णालय व पॅथॉलॉबी लॅबचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.