खोदलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स टाकणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:52 AM2018-12-05T00:52:07+5:302018-12-05T00:52:14+5:30
मुंबईत विविध सेवा पुरविणाऱ्या कंपन्या खोदकाम केल्यानंतर, त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारत नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मुंबईत विविध सेवा पुरविणाऱ्या कंपन्या खोदकाम केल्यानंतर, त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे त्या ठिकाणी खणलेला खड्डा धोकादायक ठरू शकतो. असे काही अपघात यापूर्वी झाले असल्याने, महापालिकेने उपयोगिता सेवा कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे. त्यानुसार, खोदलेला रस्ता बॅरिकेड्स लावून सुरक्षित न केल्यास, त्या कंपनीचे काम थांबवले जाणार आहे.
मुंबईत विद्युतपुरवठा, दूरध्वनी सेवा, गॅस वितरण यासारख्या विविध सेवा पुरविणाºया कंपन्या केबल व वाहिनी टाकण्यास रस्त्यांवर चर खोदत असतात. दरवर्षी मुंबईतील चारशे कि.मी.चे रस्ते खोदण्यात येतात. मात्र, काम झाल्यानंतर संबंधित कंपनी रस्ता पूर्ववत करीत नाहीत, तसेच बॅरिकेड्सही उभारत नसल्याने खोदलेले रस्ते अपघात क्षेत्र ठरते. त्यामुळे यापुढे अशा कंपन्यांची गय करणार नाही, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. अशा कंपनीचे काम तत्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास द्यावेत, ही कार्यवाही विभागस्तरीय सहायक आयुक्तांच्या स्तरावर नियमित करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अजय मेहता यांनी दिले.