चोरीची तक्रार केल्याचा राग; वाकोला पोलिसांकडून गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँक खात्यातील पैसे लंपास केल्याप्रकरणी तक्रार केली म्हणून ३३ वर्षीय महिलेची बदनामी करत तिच्याबाबत अश्लील शेरेबाजी करण्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये घडला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सांताक्रुझच्या गोळीबार परिसरात पीडित महिला पतीसोबत राहते. तिच्या शेजारीच आरोपी राहतो. सप्टेंबर, २०२० मध्ये तिचे बचत खाते असलेल्या कॅनरा बँकेतून २० हजार रुपये लंपास करण्यात आले होते. त्या प्रकरणी तिला तिचा पती व त्याचा मित्र इजाजवर संशय होता. त्यामुळे तिने या प्रकरणी वाकोला पोलिसांत त्यांच्याविराेधात तक्रार दाखल केली. तेव्हा इजाजचा भाऊ इरफान त्याला मदत करण्यासाठी आला. पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला, असा या महिलेचा आराेप आहे.
तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या वादात पडू नको असे सांगूनही इरफान तिच्याबाबत बदनामीकारक भाष्य करून तिला बदनाम करू लागला. तिचा पाठलाग करू लागला. एकदा ती मैत्रिणीसोबत जेवायला गेल्यावरही त्याने अश्लील चाळे करून दाखवले. याबाबत तिने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी इरफानवर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला.
.................................................