Join us

किड्सझेनियामध्ये विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:50 AM

कर्मचाऱ्याला अटक; पालकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

मुंबई : घाटकोपरच्या किड्सझेनियामध्ये सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींसोबत कार गेमिंगदरम्यान कर्मचाºयाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी रणबीर सिंग उदयवीर सिंग राठोड (२०) याला अटक केली आहे.दहिसर पूर्वेकडील रहिवासी असलेल्या पालकाच्या तक्रारीवरून पार्क साईट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दहिसर परिसरातील एका नामांकित शाळेत त्यांची मुलगी सातवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या शाळेतील सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थिनीना घाटकोपरच्या आरसिटी मॉलमध्ये सहलीसाठी आणण्यात आले होते. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षक वर्गही उपस्थित होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते मॉलमध्ये गेले. तेथे शिक्षकांसोबत मॉल फिरले. त्यानंतर, दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थिनी तिच्या चार मैत्रिणींसोबत मोटार कार राईड्च्या गेमिंगसाठी किड्सझेनियामध्ये गेल्या. तेथे सिंग हा कार्यरत होता. कारमध्ये बसविल्यानंतर बेल्ट लावताना तो विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करीत होता. त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. सुरुवातीला चारही मुलींसोबत त्याने असे वर्तन केले. त्यानंतर, तक्रारदार महिलेच्या मुलीलाही तोच अनुभव आला. तिने याबाबत राठोडला विचारणाही केली. तेव्हा, येथे असेच चालत असल्याचे त्याने तिला सांगून दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थिनीने अन्य मैत्रिणींसोबत शिक्षिकेकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षिकेने याबाबत किड्झेनियाच्या व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार दिली.सायंकाळी विद्यार्थिनी घरी आल्यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे तक्रारदार पालकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तिच्या शिक्षिकेकडे विचारणा करताच त्यांनी वरील घटनाक्रम सांगितला. पालकांनी मुलीला विश्वासात घेत याबाबत विचारले तेव्हा, तिने राठोडच्या विकृतीला वाचा फोडली. संबंधितावर कारवाई होणे गरजेचे असल्याने तक्रारदार पालकांनी १९ तारखेला पार्क साईट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी सिंगला विनयभंग, पॉक्सो अंतर्गत अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.तुम्हीही काळजी घ्या...विद्यार्थिनीला चांगल्या-वाईट स्पर्शाविषयी माहिती असल्याने तिने याबाबत न घाबरता शिक्षिकेला सांगितले. त्यामुळे तुम्हीही लैंगिक शिक्षणाबाबत सांगून, मुलींची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.