Join us

आग रोखण्यात जागेचा अडसर ! शिडी अडकली १९व्या मजल्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 7:39 AM

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन विभागाकडे ३०व्या मजल्यावर पोहोचणारी शिडी असलेली अत्याधुनिक गाडी आहे.

- रतींद्र नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जमिनीला सोन्याचा भाव असलेल्या मुंबईत मिळेल त्या भूखंडावर गगनचुंबी टॉवर उभारले जात आहेत. नियमावली न पाळताच एकमेकांना खेटून इमारती बांधल्या जात आहेत. एखादी आगीची घटना घडली की पुरेशा जागेअभावी अग्निशमन दलाला त्या मजल्यावर पोहोचताच येत नाही, याचाच प्रत्यय करी रोडच्या वन अविघ्न पार्कची आग रोखताना अग्निशमन विभागाला गुरुवारी आला.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन विभागाकडे ३०व्या मजल्यावर पोहोचणारी शिडी असलेली अत्याधुनिक गाडी आहे. अविघ्न पार्कच्या २२व्या मजल्यावर आग लागली. तेव्हा अग्निशमन विभागाच्या ताफ्यातील हायड्रोलीक प्लॅटफॉर्म असलेले वाहन घटनास्थळी नेण्यात आले. मर्सिडीज कंपनीच्या या वाहनात ३० मजल्यापर्यंत पोहोचता येईल इतकी उंच शिडी आहे. ही शिडी १५ ते १८ मिनिटांत हायड्रोलीकच्या आधारे उघडते. मात्र, जागेअभावी या वाहनाची शिडी पूर्णतः उघडण्यात अडचण आली. ही शिडी २०व्या मजल्यापर्यंतच उघडली गेली. पोडीअम आणि इमारत यात पुरेसे अंतर नसल्याने शिडी २२व्या मजल्यापर्यंत उघडताच आली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानाला २०व्या मजल्यावरून पाण्याचा फवारा मारण्यासाठी विशेष धडपड करावी लागली.

आग विझविताना नेमके काय झाले?वन अविघ्न पार्कला लागेल्या आगीवेळी हायड्रोलीक शिडी असलेले वाहन घटनास्थळी भायखळा येथून तत्काळ आणण्यात आले. परंतु बाजूला असलेल्या जागेमुळे शिडी पूर्ण उघडता आली नाही. त्यामुळे अडचणी आल्या, अशी माहिती हे वाहन हाताळणाऱ्या जवानाने दिली. ही शिडी २५व्या मजल्यावर पोहोचली असली तर आग लवकर आटोक्यात आणण्यात मदत झाली असती, अशी माहिती जवानाने दिली.

३०व्या मजल्यावर आग लागली तर काय?या शिडीची मर्यादा ३०व्या मजल्यापर्यंतच असून, त्यापेक्षा जास्त उंचीवर आग लागली तर काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने या इमारतीत फायर फायटर यंत्रणा अस्तित्वात व कार्यरत असायला हवी जेणे करून उंचीवरील आग आटोक्यात आणता येईल. ज्या टॉवरमध्ये अशी यंत्रणा नसेल त्या टॉवरला पालिकेकडून दंड ठोठावणे अपेक्षित असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :आग