भूमिगत कचरापेट्यांच्या मार्गात केबलच्या जाळ्यांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:55 AM2019-09-19T01:55:08+5:302019-09-19T01:55:11+5:30
उघड्यावरील कचरापेट्यांमुळे पसरणारी दुर्गंधी रोखण्यासाठी भूमिगत कचरापेट्यांची संकल्पना महापालिकेने आणली आहे.
मुंबई : उघड्यावरील कचरापेट्यांमुळे पसरणारी दुर्गंधी रोखण्यासाठी भूमिगत कचरापेट्यांची संकल्पना महापालिकेने आणली आहे. मुंबईत चार ठिकाणी बसविण्यात आलेल्या या कचरापेट्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे प्रत्येकी दहा लाख रुपये किंमत असलेल्या अशा ४० कचरापेट्या खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र या कचरापेट्या बसविण्यात भूमिगत केबल वाहिन्यांच्या जाळ्यांचा अडथळा निर्माण होत आहे.
दक्षिण मुंबईत दोन तसेच मालाड आणि कांदिवलीत प्रत्येकी एक अशा चार ठिकाणी या कचरापेट्या बसविण्यात आल्या होत्या. आता दोन घनमीटरच्या प्रत्येकी १० लाख
किमतीच्या ४० कचरापेट्यांसाठी
चार कोटी रुपये मोजण्यात
येणार आहेत. या कचरापेट्यांसाठी जागा निश्चित झाल्यानंतर
तीन महिन्यांत या कचरापेट्या
तेथे बसविण्यात येणार
आहेत.
या कचरापेटींच्या पुरवठ्यासाठी मागविलेल्या निविदेत चार कंपन्या पुढे आल्या. त्यापैकी मे. मॅक इंवायरोटेक अॅण्ड सोल्युशन प्रा. लि. या ठेकेदाराला पात्र ठरविण्यात आले. हा ठेकेदार १० लाख ३८ हजार ९६० रुपयांना एक कचरापेटी या दराने ४० भूमिगत कचरापेट्यांचा पुरवठा करणार आहे. या
प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
>भूमिगत कचरापेट्यांचा फायदा...
या कचरापेट्या भूमिगत असल्याने कचरावेचकांना व भटक्या कुत्र्यांना कचरा कुठेही पसरवता येणार नाही. पादचाऱ्यांना या कचरापेटीच्या बाजूने नाक दाबून चालावे लागणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे.