Join us

कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:48 AM

पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी चारकोप येथे भाजपतर्फे आयोजित कोकणवासीयांच्या मेळाव्यात दिले. तसेच मुंबईकरांसाठी वर्ल्ड क्लास लोकल वंदे मेट्रो तयार आहे. या गाडीमुळे मुंबईकरांची लाइफलाइन पूर्णपणे बदलणार आहे, असे स्वप्न त्यांनी दाखवले. 

बोरीवली ते थेट कोकण रेल्वे सेवा, हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंत विस्तार याबरोबर दहिसर आणि कांदिवली ही उत्तर मुंबईतील दोन रेल्वे स्टेशन स्मार्ट बनविण्यासाठी वैष्णव यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी यावेळी पीयूष गोयल यांनी केली. त्याला प्रतिसाद देताना हार्बरच्या विस्तारासाठी मोदी सरकारने ८२६ कोटी मंजूर केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. कोकणपर्यंत रेल्वे नेण्यात वसई येथे बायपासचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी १७६ कोटी मंजूर केल्याचे वैष्णव म्हणाले.

आता बोरिवली हेच माझे पहिले घर 

बोरिवली हेच आता माझे पहिले घर आहे आणि माझ्या हातून काही चांगले घडावे यासाठी मी येथे आलो आहे, असे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी कांदिवली येथील त्यांच्या नमो यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले. बोरीवलीने माझ्या कुटुंबाला आणि आम्ही बोरिवलीकरांना आमच्या जीवनात सामावून घेतल्याचे ते म्हणाले.

दहिसर-कांदिवली स्टेशनला स्मार्ट बनवा

हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत आणणे, ही आताच्या घडीला येथील ज्वलंत मागणी आहे. रेल्वे मेट्रोला जोडली तर खूप फरक पडेल. बोरिवली, मालाड ही दोन स्टेशन स्मार्ट होत आहेत. पुढच्या टप्प्यात दहिसर आणि कांदिवलीला स्मार्ट स्मार्ट स्टेशन बनविण्यात यावे. - पीयूष गोयल

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तरपीयुष गोयलअश्विनी वैष्णवभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४