Join us

मंडप परवानगीतील विघ्ने झाली दूर; एक खिडकी योजनेचा मंड‌ळांना झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 2:15 PM

आता मूर्तिकारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेश मूर्तिकारांना दरवर्षी गणेशमूर्ती कार्यशाळेसाठी पालिका, वाहतूक पोलिस व अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळविण्यासाठी मूर्तिकारांना वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस ठाणे आणि अग्निशमन दलाकडे स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या प्राधिकरणांनी परवानगी दिल्यानंतरच मुंबई महापालिकेकडून मंडपासाठी परवानगी मिळत होती. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी मूर्तिकारांना स्वतः सर्वत्र फिरावे लागत होते. मुंबई पालिकेकडून १ ऑगस्टपासून एक खिडकी कार्यपद्धतीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ६ हून अधिक मंडळांना या प्रणालीमधून परवानगी दिल्याची माहिती पालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे. जशी गणेशोत्सवाची तारीख जवळ येईल, तशी परवानगींची संख्या अधिक गतीने वाढेल, अशी माहिती त्यांनी दिली. आता मूर्तिकारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मंडप परवानगी देण्यासाठी पालिका प्रशासनाने एक खिडकी कार्यपद्धती सुरू केली आहे.

...असा करा अर्ज

ऑनलाइन परवानगीची सुविधा पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. पालिकेच्या पोर्टलवरील ‘फॉर सिटीझन - अप्लाय - पंडाल (गणेशोत्सव / नवरात्रोत्सव), ऑनलाइन मूर्तिकार / स्टॉकिस्ट परमिशन’नुसार अर्ज करता येणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in येथे उपलब्ध आहे.

गणेश मूर्तिकारांनी मागील वर्षी दिलेल्या मंडप परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये नमूद करावा. ज्या मूर्तिकारांनी यापूर्वी विभाग कार्यालयात असंगणकीय पद्धतीने (ऑफलाइन) अर्ज केला होता, त्यांनी त्याची प्रत संगणकीय अर्जासह सादर करावी, असेही आवाहन पालिकेने केले आहे.

अर्जासोबत 'या' गोष्टी अनिवार्य

  • अर्जदारांना हमीपत्रही डाऊनलोड करावे लागणार.
  • अर्जासोबत आधारकार्डची स्वयंसाक्षांकित प्रत.
  • एक हजार रुपये अनामत रक्कम जमा करणे.
  • मागील वर्षीच्या परवानगीचा क्रमांक नोंद आवश्यक.
  • ऑफलाइन अर्ज केला असल्यास त्याची प्रत.
टॅग्स :गणेशोत्सवमुंबई