मेट्रोच्या ट्रॅकवर अडथळे
By Admin | Published: October 11, 2015 01:38 AM2015-10-11T01:38:44+5:302015-10-11T01:38:44+5:30
देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही व्यापार आणि उद्योगधंद्याचे केंद्रबिंदू आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण पायाभूत सुविधांवर पडू लागला आहे. सद्य:स्थितीत
- तेजस वाघमारे
देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही व्यापार आणि उद्योगधंद्याचे केंद्रबिंदू आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण पायाभूत सुविधांवर पडू लागला आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या रेल्वे आणि बस वाहतुकीवर प्रचंड भार निर्माण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई मेट्रो रेल व्यवस्थेकरिता बृहत् योजना तयार केली आहे.
२00४मध्ये एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या बृहत् आराखड्यामध्ये एकूण ९ मेट्रो मार्गांचा समावेश होता. या मार्गांची एकूण लांबी १४६.५0 कि.मी. इतकी होती. हे प्रकल्प २0२१पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, आराखड्यातील मेट्रो मार्गांची अंमलबजावणी आणि धोरण निश्चित करताना आराखड्यामध्ये बदल करावा लागला. सुधारित आराखड्यानुसार मेट्रो मार्गांची लांबी १७२ कि.मी. एवढी निश्चित करण्यात आली आहे.
मात्र मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीत विविध अडथळे आणि आव्हाने आल्याने प्रकल्पांना एक दशकाचा विलंब झाला आहे. प्रस्तावित बृहत् आराखड्यापैकी फक्त वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा ११.४ कि.मी. लांबीचा मेट्रो १ मार्ग सुरू आहे. भाडेवाढीमुळे ती चांगलीच वादात राहिली. हा अनुभव आणि प्रकल्पातील अडथळ्यांमुळे चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रोसाठी रिलायन्स कंपनीसोबतचा करार शासनाने रद्द केला.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाला विविध क्षेत्रांतून विरोध झाला. याचे कारशेड आरे कॉलनीत सुरू करण्यास मुंबईकरांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यानुसार शासनाने समिती नेमून पर्यायी जागेचा शोध घेतला. मेट्रो-३च्या आरे कॉलनीतील प्रस्तावित कार डेपोच्या उभारणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून, या अहवालात आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय देण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या आराखड्यानुसार मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता उर्वरित मेट्रो प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी काही मेट्रो प्रकल्पांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित प्रकल्पानुसार दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मेट्रो २ आणि ७ या मार्गांच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रोच्या कामांनी गती घेतल्यास पुढील पाच ते सात वर्षांत मुंबईच्या वाहतुकीचे रुपडे बदलणार आहे. सुधारित आराखड्यानुसार दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा ४0 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग २, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मार्गे वडाळा मुख्य टपाल कार्यालय आणि आर.ए. किडवाई मार्ग हा ४0 कि.मी.चा मेट्रो ४ प्रकल्प आहे. तर दहिसर (पू.) ते अंधेरी (पू.) ते वांद्रे (पू.) हा २७ कि.मी.चा मेट्रो मार्ग ५ आणि जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता हा ११ कि.मी. लांबीचा मेट्रो ६ असे एकूण ११८ कि.मी.चे मेट्रो जाळे उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी ३५,४00 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. परंतु, हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
एमएमआरडीएने प्रकल्पाच्या कामाचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेसाठी ४ महिने, मेट्रो व्हायाडक्ट व स्थानकांसाठी २ वर्षे तसेच सिग्नल, ट्रॅक तयार करणे, मेट्रोची चाचणी घेणे यासाठी १ वर्ष अपेक्षित आहे. परंतु मेट्रो १ प्रकल्पातील अनुभव पाहता प्रस्तावित प्रकल्प पूर्ण होण्यास २0२१पेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. पूर्वानुभवाने मेट्रो प्रकल्प खासगी कंपन्यांच्या सहकार्याने राबविण्याऐवजी ते राज्य, केंद्र आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज साह्य घेऊन राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मेट्रो प्रकल्प हे पश्चिम उपनगरातील बहुतांश विभागांना जोडणारे आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे आणि बस सेवेवरील ताण कमी होईल. परंतु पश्चिम उपनगराच्या तुलनेत पूर्व उपनगरात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली प्रकल्प वगळता दुसरा कोणताही प्रकल्प जात नाही. त्यामुळे पूर्व उपनरात जाणाऱ्या प्रवाशांना पुढील दशकांमध्ये मध्य रेल्वेवर विसंबून राहावे लागणार आहे. वांद्रे-मानखुर्द हा मार्ग प्रस्तावित असला तरी पूर्व उपनगरातील जनतेला तितकासा लाभदायक नाही. याउलट परिस्थिती पश्चिम उपनगरातील अंधेरी ते दहिसरपर्यंतच्या विभागांची असणार आहे. मेट्रो १, मेट्रो २चा पहिला टप्पा, मेट्रो ३ आणि मेट्रो ५ हे प्रकल्प अंधेरीला जोडण्यात आले आहेत. त्यानुसार अंधेरी हे मेट्रो हब ठरणार आहे.
अडथळ्यांची शर्यत पार करत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो १ धावली. पण एमएमआरडीएच्या बृहत् आराखड्यातील इतर प्रकल्प एका दशकापासून रखडले आहेत. विविध अडथळ्यांमुळे प्रस्तावित चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो मार्गामध्ये बदल करण्यात आला असून, हा प्रकल्प दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द असा असणार आहे. या मेट्रोच्या दहिसर ते डी.एन. नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ आॅक्टोबर रोजी) होणार आहे.
मेट्रोसाठी 35,400कोटी
दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या 40किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएने 12,000कोटी मंजूर केले आहेत.
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मार्गे वडाळा मुख्य टपाल कार्यालय आणि आर.ए. किडवाई मार्ग- ४,४0 कि.मी. लांबीचा मार्ग असून, त्यासाठी 12,000कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
दहिसर (पू.) ते अंधेरी (पू.) ते वांद्रे (पू.) मेट्रो मार्ग ५ हा २७ कि.मी.चा असून, त्यासाठी8,100कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
जोगेश्वरी-विक्रोळी
मेट्रो ६ हा ११ कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी 3,300कोटी मंजूर करण्यात आले आहेत.