मुंबई: पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यात उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी चारकोप येथे भाजपतर्फे आयोजित कोकण वासीयांच्या मेळाव्यात दिले. तसेच मुंबईकरांसाठी वर्ल्ड क्लास लोकल वंदे मेट्रो तयार आहे. या गाडीमुळे मुंबईकरांची लाईफलाईन पूर्णपणे बदलणार आहे, असे स्वप्न त्यांनी दाखवले.
बोरीवली ते थेट कोकण रेल्वे सेवा, हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार याबरोबर दहिसर आणि कांदिवली ही उत्तर मुंबईतील दोन रेल्वे स्टेशन स्मार्ट बनविण्यासाठी वैष्णव यांनी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी पीयूष गोयल यांनी केली. त्याला प्रतिसाद देताना हार्बरच्या विस्तारासाठी मोदी सरकारने ८२६ कोटी मंजूर केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. कोकणपर्यंत रेल्वे नेण्यात वसई येथे बायपासचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी १७६ कोटी मंजूर केले आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गात असलेले पुढील अडथळे गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्या आधी गोयल याना सहा लाखांच्या फरकाने निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले. दहिसर-कांदिवली स्टेशनला स्मार्ट बनवाहार्बर सेवा बोरिवलीपर्यंत आणणे, ही आताच्या घडीला येथील ज्वलंत मागणी आहे. रेल्वे मेट्रोला जोडली तर खूप फरक पडेल. बोरिवली, मालाड ही दोन स्टेशन स्मार्ट होत आहेत. पुढच्या टप्प्यात दहिसर आणि कांदिवलीला स्मार्ट स्मार्ट स्टेशन बनविण्यात यावे.- पीयूष गोयल