लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आणि परिसरातील प्रमुख बंदरांलगत गाळाचा उपसा न झाल्याने जलवाहतुकीत अडथळे येत आहेत. ओहोटीच्या वेळी फेरीबोटी गाळात रुतण्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतरही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने फेरीबोट चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
समुद्राच्या लाटांबरोबर वाळू आणि अन्य गाळ किनाऱ्यापर्यंत वाहून येतो. या गाळाचे संचयन झाल्यास पाण्याची खोली कमी होते. जलवाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या जेट्टी किंवा धक्क्यांलगत गाळ साचल्यास वेळोवेळी त्याचा उपसा केला जातो. अन्यथा फेरीबोटी गाळात रुतण्याचा धोका असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत मोरा आणि रेवस या धक्क्यांलगतचा गाळ बाहेर न काढल्याने वाहतुकीतील अडथळ्यांत वाढ झाल्याचे मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्थेचे सरचिटणीस शराफत मुकादम यांनी सांगितले.
ओहोटीच्या काळात पाण्याची पातळी कमी झाली की बोटी गाळात रुतण्याच्या घटना वाढतात. गेल्या काही वर्षांत गाळउपसा न झाल्याने ही समस्या तीव्रतेने जाणवू लागली आहे. महिन्यातून किमान १० ते १२ घटनांची नोंद होते. अशावेळी प्रवाशांना तीन ते चार तास बोटीत अडकून रहावे लागते. समुद्राला भरती आल्यानंतर बोटी गाळातून बाहेर निघतात. काही वेळा अन्य बोटींच्या आधारे त्यांना बाहेर काढावे लागते. या सगळ्यात प्रवाशांचे अतोनात हाल होतात. काही प्रवासी सहकार्य करतात, बरेचजण विनाकारण हुज्जत घालतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाशी संबंधित अधिकारी कॅ. संजय शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
....................
गाळउपसा न झाल्याने बोटी रुतण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु त्यांनी कोणत्याही उपाययोजना हाती घेतल्या नाहीत. गाळ वेळीच बाहेर न काढल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटना घडू शकतात.
- शराफत मुकादम, सरचिटणीस, मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्था
.......
प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करायचे कोणी?
बोट गाळात रुतल्यानंतर तीन-चार तास अडकून पडलेले प्रवासी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे तक्रारी करतात. बोर्डाकडून त्या फेरीबोट मालकांकडे पाठविल्या जातात. गाळउपसा न झाल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे उत्तर फेरीबोट व्यावसायिक देतात. अशा टोलवाटोलवीमुळे प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण कोणी करायचे, हा प्रश्न अनुत्तरीच राहतो.