प्रकल्पांच्या मार्गात अडथळे
By admin | Published: April 4, 2016 02:24 AM2016-04-04T02:24:11+5:302016-04-05T17:54:39+5:30
उपनगरीय रेल्वे सुसाट व वक्तशीर होण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहा मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असून
सुशांत मोरे, मुंबई
उपनगरीय रेल्वे सुसाट व वक्तशीर होण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहा मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी अनेक अडथळ्यांतून जावे लागणार आहे. दोन एलिव्हेटेड मार्ग, रेल्वेमार्गांवर सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम) प्रकल्प आणि एमयूटीपी-३मधील तीन प्रकल्प या प्रकल्पांमुळे उपनगरीय मार्गावरील प्रवाशांचे अनेक प्रश्न सुटणार असले तरी ३९ हजार ७२ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसमोर भूसंपादन आणि निधीसारखे अनेक अडथळे असल्याचे एमआरव्हीसीचे अधिकारी सांगतात. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
सध्या एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-२चे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. यामध्ये ७२ नव्या बम्बार्डियर लोकल, मध्य रेल्वेवरील डीसी ते एसी परिवर्तन, १२ स्थानकांदरम्यान रूळ ओलांडून होणारे अपघात रोखणे, हार्बरवरील अंधेरीचा विस्तार गोरेगावपर्यंत, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. साधारण २0२१ सालाच्या आत हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. या प्रकल्पांमुळे मुंबई उपनगरीय लोकलवर पडणारा ताण बराचसा कमी होईल. मात्र या प्रकल्यांबरोबरच भविष्यात आणखी सहा महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ते पूर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणखी सुसाट व वक्तशीर होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.