मुंबई : कर्करोगाच्या उपचारप्रक्रियेदरम्यान किरणोत्सर्ग आणि किमोथेरपीमुळे बाधित होणारी त्वचा पुनर्रोपित करता येते. या पुनर्रोपणच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा एकदा सामान्यपणे आयुष्य जगता येते, असे प्रतिपादन आॅन्कॉलोजिस्ट डॉ. विजय हरिभक्ती यांनी शनिवारी केले. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कर्करोग रुग्णांना उपचारादरम्यान बाधित झालेल्या त्वचेने शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णाला नैराश्य येण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. हरिभक्ती यांनी नोंदविले. त्यामुळे अशा वेळी नव्या संशोधनाच्या आधारे त्वचेचे करण्यात येणारे पुनर्रोपण हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. हरिभक्ती म्हणाले की, तोंडाच्या कर्करोगामुळे बऱ्याचदा जीभ, स्वरयंत्र, गालाची त्वचा बाधित होते. त्यामुळे त्या रुग्णाला दैनंदिन व्यवहार करणे अशक्य होते. बोलणे, खाणे, गिळणे या प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून या रुग्णांनी आता पुनर्रोपण शस्त्रक्रियेविषयी जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.युरोलॉजी प्रा. डॉ. आशिष कामत यांनी सांगितले की, मान, तोंड, स्तन, जीभ अशा भागांमधील कर्करोगाच्या उपचारप्रक्रियेत त्वचा बाधित होण्याची शक्यता असते. जीभ बाधित झाल्यानंतर ती पुनर्रोपित करण्यासाठी रुग्णाच्या मनगटाजवळील त्वचा काढून जिभेच्या आकारात त्यांची बांधणी करून लावली जाते. त्यामुळे रुग्णाला बोलणे, खाणे, गिळणे शक्य होते; मात्र त्या शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला भविष्यात काळजी घ्यावी लागते. कर्करोग बरा होतो यानंतर आता पुनर्रोपण शस्त्रक्रियेविषयी जनजागृतीसाठी सर्व शासकीय आणि अशासकीय पातळ्यांवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीतजास्त रुग्ण कर्करोगाच्या भीतीतून बाहेर येऊन सामान्य आयुष्य जगू शकतात.
बाधित त्वचेचे होणार पुनर्रोपण
By admin | Published: February 06, 2017 3:40 AM