दहिसर येथील प्रवेशद्वाराचा मेट्रोच्या कामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:00 AM2020-10-08T02:00:20+5:302020-10-08T02:00:35+5:30
मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रशासनामार्फत प्रवेशद्वाराची दुरुस्ती केली जाणार
मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ प्रकल्पाच्या कामासाठी दहिसरमध्ये असलेल्या मुंबईच्या प्रवेशद्वाराचा काही भाग तोडावा लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम महापालिकेने थांबवले आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रशासनामार्फत प्रवेशद्वाराची दुरुस्ती केली जाणार आहे.
मेट्रो-७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वपर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो-७चा विस्तार मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येणार आहे. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो-९च्या कामाचे कंत्राट सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले आहे. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो-९ ही रेल्वे १३.५ किलोमीटर असून २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
परंतु, या प्रकल्पाच्या मार्गात दहिसर येथील प्रवेशद्वाराचा काही भाग अडथळा ठरत आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराचे डाव्या बाजूचे काम अर्धे तोडावे लागणार आहे. मात्र दहिसर येथे असणारे मुंबईचे प्रवेशद्वार हे मुंबईचे वैभव आहे. त्यामुळे या वास्तूचे वैभव टिकवण्यासाठी पालिका आणि मेट्रो प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मेट्रो-७चा विस्तार मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येणार आहे. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो-९च्या कामाचे कंत्राट सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने आॅक्टोबर २०११मध्ये सात कोटी रुपये खर्च करून दहिसर पूर्व येथे प्रवेशद्वार उभारले आहे. प्रवेशद्वाराची उंची १२५ फूट असून त्याला १० पिलर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे २०१९पासून या प्रवेशद्वाराच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.