मंडप उभारणीत परवानगीचे विघ्न; आॅनलाइन कारभारामुळे मंडळे त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:42 AM2018-08-23T04:42:58+5:302018-08-23T04:43:28+5:30

संथगतीने सुरू असलेल्या आॅनलाइन कारभारामुळे मंडप उभारण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही

Obstruction of permission for establishment of a booth; Circles suffer due to the online functioning | मंडप उभारणीत परवानगीचे विघ्न; आॅनलाइन कारभारामुळे मंडळे त्रस्त

मंडप उभारणीत परवानगीचे विघ्न; आॅनलाइन कारभारामुळे मंडळे त्रस्त

Next

मुंबई : मुंबईतील बहुतांशी गणेशोत्सव मंडळे येत्या रविवारी म्हणजे २६ आॅगस्ट रोजी गणेशमूर्ती आणण्याच्या तयारीत आहेत. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या आॅनलाइन कारभारामुळे मंडप उभारण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. तर गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने पुन्हा अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणरायाच्या मार्गातील ही विघ्ने दूर कशी करावीत? असा पेच मंडळांपुढे निर्माण झाला आहे.
विविध परवानग्यांसाठी सार्वजनिक मंडळांची होणारी दमछाक थांबविण्यासाठी या वर्षीपासून आॅनलाइन पद्धत सुरू करण्यात आली. मात्र, सर्व्हर डाऊन, अधिकाऱ्यांची कार्यालयात गैरहजेरी, मंडळांच्या पदाधिकाºयांमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याबाबत अज्ञान अशा अनेक अडचणींमुळे मंडपांना परवानगी मिळण्याची प्रक्रिया लांबली आहे. रस्ते व पदपथांवर मंडप उभारणारी सुमारे २ हजार २०० मंडळे परवानगीसाठी पालिकेकडे दरवर्षी अर्ज करीत असतात. या वर्षी आधी परवानगी नंतरच मंडप, असे धोरण महापालिकेने अवलंबिले आहे. त्यामुळे अद्याप मुंबईत अनेक ठिकाणी गणेशमूर्ती आणण्याची वेळ आली तरी मंडपाचा पत्ता नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे मंडपातील सजावटी व देखावे तयार करण्याचीही पंचाईत झाली आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढून परवानगी प्रक्रियेला वेग आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापौरांकडे तातडीच्या बैठकीची विनंती केली आहे.

सुट्टीच्या दिवशी अर्ज घ्यावा
अनेक विभाग कार्यालयांत तांत्रिक अडचणींना मंडळांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी अधिकारीच उपस्थित नसतात. अंधेरी विभागाकडे आलेल्या ७२ अर्जांपैकी केवळ दोन ते तीनच आतापर्यंत मंजूर झाले आहेत, अशी तक्रार मंडळांनी केली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असल्याने मंडप परवानगीच्या प्रक्रियेसाठी सुट्टीच्या दिवशीही विभाग कार्यालयांत व्यवस्था करण्यात यावी; तसेच अर्ज घेण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी समितीने केली आहे.

नियमानुसार परवानगी
उच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या नियमात राहूनच मंडपाला परवानगी देण्यात येत आहे. मंडपासाठी महापालिकाच नव्हेतर पोलीस, वाहतूक पोलिसांचीदेखील परवानगी घ्यावी लागते. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून मंडपांना परवानगी देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जात आहे.

खड्ड्यांचे विघ्न कायम
मुंबईत दरवर्षी गणरायाचे आगमन खड्ड्यांतून होते. जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते खड्ड्यांत गेले होते. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेडिओ जॉकी मलिष्काचे यावर काढलेले विडंबन गीतही गाजले. आॅगस्ट महिन्यात पावसाने बराच काळ विश्रांती घेतल्यामुळे खड्डे भरण्याचे काम वेगाने झाले. परंतु गेल्या दोन दिवसांत पावसाने मुंबईत जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली असून गणेशमूर्ती आणताना सावधगिरी बाळगण्याची सूचना करण्यात आल्याचे समन्वय समितीचे पदाधिकारी नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

आधी मंडप लावू द्या! : महापालिकेच्या संथ कारभाराचा फटका मंडळांनी का सोसावा? बहुतांशी मंडळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गणेशमूर्ती आणतात. त्यानुसार येत्या रविवारी गणेशमूर्तींचे आगमन होईल. त्यापूर्वी परवानगी नसली तरी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी दहिबावकर यांनी केली आहे.

Web Title: Obstruction of permission for establishment of a booth; Circles suffer due to the online functioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.