मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण शहरांना जोडणाऱ्या मेट्रो ५ मार्गिकेतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. या मार्गिकेच्या आड येणारी कांदळवनाची ३१ झाडे तोडण्याची परवानगी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मिळाली आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या कामाला वेग येण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मेट्रो ५ मार्गिकेच्या १२.७ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ६ स्थानकांची कामे सुरू आहेत; मात्र या मार्गिकेच्या उभारणीत भिवंडीमधील कशेळी गावाच्या हद्दीत येणाऱ्या कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. अखेर हा अडथळा दूर झाला असून, ‘एमएमआरडीए’ला कांदळवनाची झाडे तोडण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार कशेळी येथील खाडीतील ०.३२ हेक्टर क्षेत्रातील ३१ कांदळवनाची झाडे तोडावी लागणार आहेत. त्याचबरोबर याच भागातील ०.३७७ हेक्टर वनजमीनही मेट्रो मार्गिकेत बाधित होणार आहे. ही जमीन मेट्रोच्या कामासाठी हस्तांतरित करण्यासाठीही वनविभागाची मंजुरी ‘एमएमआरडीए’ला मिळाली आहे.
पर्यावरणीय मंजुरी :
मेट्राे मार्गिकेच्या कामातील पर्यावरणीय मंजुरीचा अडथळा आता दूर झाल्याने उर्वरित कामे पूर्ण करून मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
५०० झाडांची लागवड :
या वनजमिनीच्या बदल्यात ‘एमएमआरडीए’ला प्रकल्पाच्या नजीकच्या परिसरात सुमारे ५०० झाडांची लागवड करावी लागणार आहे. तर स्थानिकांना लागवडीसाठी ५०० झाडे वितरित करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सद्य:स्थितीत या मार्गिकेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेही पूर्ण जलदगतीने पूर्ण करून प्रकल्प मार्गी लावण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.