स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्रे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:10+5:302021-09-24T04:07:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.
मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगर परिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात निवडणुका होणार आहेत. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यांनुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणेकरून नामनिर्देशनपत्र सादर करताना धावपळ होणार नाही आणि एकही इच्छुक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.