मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि शहरातून अनेक शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्कमध्ये आले होते. याचबरोबर, स्मृतिदिनाचे औचित्य साधत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्त केले. यासंदर्भात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली.
तळागाळातल्या माणसात बाळासाहेब ठाकरे यांनी उत्साह भरला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी या स्मारकाची संकल्पना आखण्यात आली आहे. प्रेरणा देणारे स्मारक उद्धवजींच्या संकल्पनेतून साकारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, जे लोक स्मारकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, त्यांच्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि ऊर्जा पोहोचवण्याचे काम या नवीन संकेतस्थळातून होईल, असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केला.
विशेष बसगाड्यांची सोय-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान आज नोव्हेंबर रोजी विशेष बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. राज्य आणि शहरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दादर स्थानक (पश्चिम), दादर हिंदू स्मशानभूमीदरम्यान शिवाजी पार्कमार्गे बसमार्ग क्रमांक फेरी-2वर विशेष बसगाड्या सकाळी 7 ते सायं. 7 वाजेपर्यंत सोडण्यात येतील. दादर स्थानक (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरून या बस धावतील.