निमित्त ‘उड्डाणपुलां’चे, संधी ‘राजकीय उड्डाणा’ची
By admin | Published: December 23, 2016 03:55 AM2016-12-23T03:55:58+5:302016-12-23T03:55:58+5:30
कोणताही मुद्दा आगामी निवडणुकीत शेकू शकतो, याची जाणीव असल्याने आता सत्ताधारी चांगलेच कामाला लागले आहेत.
मुंबई : कोणताही मुद्दा आगामी निवडणुकीत शेकू शकतो, याची जाणीव असल्याने आता सत्ताधारी चांगलेच कामाला लागले आहेत. एकाच झटक्यात शेकडो जीव धोक्यात आणू शकणाऱ्या मुंबईतील उड्डाणपुलांचे स्मरण अखेर शिवसेनेला झाले आहे. मोडकळीस आलेल्या आणि तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या या पुलांच्या दुरुस्तीचे काम तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऐन निवडणुकीत हाती घेण्यात येणार आहे. प्रत्यक्षात या पुलांचे काम सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या शिलेदारांनी त्याचे श्रेय लाटण्यास सुरुवातही केली आहे.
महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून मुंबईतील ५६ पुलांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याचे समोर आले. यापैकी २२ उड्डाणपूल शहर, ३० पूर्व उपनगर आणि ४ पश्चिम उपनगरात आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने (स्टॅक) केलेल्या शिफारशींनुसार पालिकेने या पुलांची तपासणी सुरू केली. मात्र काही महिन्यांनी पालिकेने पुन्हा डोळ्यांना झापडे लावून घेतली.
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने उड्डाणपुलाच्या प्रश्नाने सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ केले आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी काही महत्त्वाच्या पुलांच्या पृष्ठभागाची डागडुजी व त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग आणि शीव येथील उड्डाणपूल तसेच चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील आॅर्थर रोड रेल्वे पुलावर मॅकेनाईज मास्टिक अस्फाल्टचा थर चढवला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी
दिली. (प्रतिनिधी)
मुंबईत एकूण 314 पूल आहेत. यापैकी काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी नियुक्त स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने २००९मध्ये दुरुस्तीची शिफारस केली.
चिंचपोकळी स्टेशन येथील उड्डाणपूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावरही पावसात खड्डे पडले असून, काही भाग खराब झालेला आहे. या दोन्ही पुलांसाठी ३.९३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
आता झाली पुलांची आठवण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील संत ज्ञानेश्वर उड्डाणपूल हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बांधलेला असून, नोव्हेंबर
2012मध्ये महापालिकेने ताब्यात घेतला आहे. परंतु या उड्डाणपुलाचा हमी कालावधी संपला आहे.
या पुलावरील खड्डे भरण्याची कामे व डागडुजी केली नव्हती. वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टॅक कमिटीच्या शिफारशीनुसार, मॅकेनाईज मास्टीकचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी १२.४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.