कर्जत : तालुक्यात पोसरी नदीच्या पाण्यावर चई चेवणे परिसरात जवळपास २० शेतकऱ्यांनी पन्नास एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन सिमला मिरचीचे उत्पादन घेतले. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतीचा खर्च तरी भरून निघेल का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या ओलमण, खांडस परिसरात तेथील रहिवाशी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून उन्हाळ्यात भाजीपाला शेती करतात.त्यापैकी चई आणि चेवणे परिसरातील शेतकरी पोसरी नदीच्या पाण्यावर सिमला मिरचीचे उत्पादन शेतीमधून घेतात. चई येथील १८ आणि चेवणे येथील २ शेतकरी सिमला मिरची पिकवून त्याची विक्र ी वाशी आणि कल्याणच्या बाजारात करून आपले कुटुंब चालवितात. त्यासाठी लागणारी जमीन देखील भाड्याने घ्यावी लागणाऱ्या शेतकरीवर्गावर यावर्षी अवकाळी पावसाने कृपादृष्टी फिरविली आहे. कारण त्या पन्नास एकर शेतीमधून दररोज वाशीच्या बाजारात जाणारी मिरची जात नाही.जानेवारीपाठोपाठ फेब्रुवारी आणि उरलेसुरले नुकसान मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने करून त्या २० शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे.कारण भाड्याने घेतलेली जमीन, कृषिपंप, बियाणे, खते,औषधे,मजुरी यांच्यासाठी एकरी केलेला ५५ हजारांचा खर्च परत मिळविणे कठीण होऊन बसल्याचे मिरची उत्पादक शेतकरी भास्कर आगिवले यांचे म्हणणे आहे.जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाबद्दल तालुका कृषी अधिकारी आणि कर्जत पंचायत समिती यांना कळविण्यात आल्यानंतर अधिकारी आले आणि फार्महाऊसमध्ये बसून पंचनामे केले.त्यावेळी नुकसानभरपाई म्हणून २० पैकी केवळ एका शेतकऱ्याला एक हजार रु पयाचा धनादेश देण्यात आला आहे.ही आमच्या सर्व शेतकरीवर्गाची थट्टा आहे, असा आरोप हे शेतकरी करीत आहेत. मिरचीला कमी पाणी लागत असल्याने आणि पावसाचे पाणी झेलण्याची क्षमता या झाडांची नसल्याने अवकाळी पावसाने झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरचीचा आकार लहान झाला आहे, तर रंग देखील हिरव्याऐवजी लालसर आणि पांढरा झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये भाव मिळत नाही. झाडावर असलेली फुले गळून पडणे, फळे म्हणजे मिरची झाडावर सुकून जाणे आदींबरोबर झाडांची पाने करपू लागली आहेत.
अवकाळीने मिरची पीक उद्ध्वस्त
By admin | Published: April 02, 2015 10:42 PM