अनधिकृत हॉटेल अनेक्सची जागा ताब्यात घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:45+5:302021-03-22T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत होऊ घातलेल्या शासनाच्या प्रकल्पातील मूलभूत सुविधांची जागा विकासकाने हॉटेल अनेक्सच्या नावाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत होऊ घातलेल्या शासनाच्या प्रकल्पातील मूलभूत सुविधांची जागा विकासकाने हॉटेल अनेक्सच्या नावाने गिळंकृत करत असून तत्काळ हॉटेल बंद करून जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
अंधेरी पूर्व एमआय डीसी रोड क्रमांक ७ वर आकृती ट्रेंड सेंटरच्या लगत आकृती अनेक्स या एस.आर.ए.च्या इमारतीमध्ये दोन मजल्यावर हॉटेल अनेक्स एक्झिक्युटिव्ह नावाचे सर्व सुविधायुक्त व्यावसायिक हॉटेलची निर्मिती केली असून ती बेकायदा पद्धतीने उभारली गेली आहे.
या इमारतीतील जी जागा झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत गरजा पुरविण्यासाठी म्हणजेच, बालवाडी, सोशल वेल्फेअर सेंटर, समाज मंदिर निर्मितीसाठी आहे. मात्र तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल यांनी ही जागा गडप करण्याच्या हेतूने हॉटेल बांधले आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्रकल्पातील जागेची चोरी करून शासन व प्रशासनाला फसवून दिशाभूल करून येथे अनेक्स नावाचे हॉटेल बांधून भाड्याने चालवले जात आहे. कायद्याच्या राज्यात हुकूमशाही चालू असून ही दंडेलशाही प्रकार थांबवून मूळ प्रकल्पग्रस्थांना सोबत घेऊन नियमाप्रमाणे कारभार अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर आणि राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उद्योगसारथी मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे.