मुंबई - मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नसून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र हवामानाची स्थिती पाहून वाहतुकीसाठी सी लिंक वाहतुकीसाठी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, ‘ओखी’ चक्रीवादळामुळे 5 ते 7 डिसेंबरदरम्यान समुद्रात 5 मीटरपेक्षा उंच (भरतीच्या पाण्याची पातळी) लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिना-याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
समुद्रालगतच्या जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी!मुंबईच्या किना-यावर घोंगावणा-या ओखी वादळाच्या इशा-यानंतर मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी उशिरा जाहीर करण्यात आला.या जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरूच राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.
वादळाचा मोर्चा सुरतकडे!‘ओखी’ चक्रीवादळाने मोर्चा गुजरातकडे वळविल्याने, मुंबईसह कोकण किनारपट्टीचा धोका कमी झाला आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या १८३ खलाशी आणि मच्छीमारांची सुटका केल्याची माहिती, तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक के. आर. नौटियाल यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्रापासून ४५ सागरी मैलांवर घोंगावणाºया ‘ओखी’ने दिशा बदलली आहे. गुजरातच्या दिशेने वादळ घोंगावल्याने मुंबईवरील धोका टळला आहे. ताशी १०० मैल वेगाने वाहणारे वारे आणि ५ ते ६ मीटर उंचीच्या लाटांमुळे मच्छीमार व खलाशांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.