आॅक्टोबर हीटने मुंबईकर हैराण
By admin | Published: October 3, 2015 02:48 AM2015-10-03T02:48:49+5:302015-10-03T02:48:49+5:30
आॅक्टोबरच्या पहिल्या दोन दिवसांतच पारा ३७ अंशांवर चढल्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. तर दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे थोडा थंडावा मिळाला आहे.
मुंबई : आॅक्टोबरच्या पहिल्या दोन दिवसांतच पारा ३७ अंशांवर चढल्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. तर दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे थोडा थंडावा मिळाला आहे. पण सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे मुंबईकर आजारी पडण्याचा धोका वाढला असून सर्वांनी सतर्क राहावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे मुंबईकरांना त्रास होऊ शकतो. मध्यंतरी मुंबईत स्वाइन फ्लूची साथ पसरली होती. वाढणाऱ्या उकाड्यामुळे स्वाइनच्या रुग्णांत घट झाली असती. पण मध्येच पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढण्याचा धोका उद्भवतो. यामुळे सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. स्वाइन फ्लूसारखे संसर्गजन्य आजार पसरल्यास एकदम थंडी अथवा तापमान बदलल्यास हा आजार कमी होतो. मात्र सध्या तापमानात बदल होण्याची शक्यता असल्याने ज्या व्यक्तींना आजाराची लक्षणे आहेत त्यांना आजाराचा धोका अधिक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे साथरोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.
डॉ. श्रीवास्तव यांनी पुढे सांगितले, की सतत बदलत्या वातावरणात आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. स्वत: औषधे घेऊ नयेत. आजार अंगावर काढल्यास तो बळावण्याची भीती असते. उकाडा वाढल्यावर विशेष काळजी घेतली पाहिजे.
फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले, की तापमानात वाढ झाल्यावर सतत पाणी पिण्याची आवश्यकता आहे. वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होऊन त्रास बळावू शकतो. सतत बदलणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास बळावू शकतो. याचबरोबरीने श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. (प्रतिनिधी)