मुंबई : पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीही मुंबईकरांना उन्हाच्या तापदायक झळा बसत असून पुढील दोन ते तीन दिवस असेच वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबईकरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा तडाखा बसत आहे. पाऊस विश्रांतीवर गेल्याने तसेच तापदायक वातावरणामुळे जलधारांऐवजी मुंंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत.
मुंबईकरांना शुक्रवारीच चढत्या पाऱ्याचा किंचित अनुभव आला होता. शनिवारी त्यात आणखी भर पडली. हवामान खात्यानेदेखील तापमानात वाढ नोंदविली. विशेषत: शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वातावरण चांगलेच तापले होते. रखरखीत ऊन दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कायम होते. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा वापर केला. बाजारपेठांमध्येही भाजी विक्रेत्यांनी पावसापासून वाचण्यासाठी वापरात येणारी छत्री उन्हापासून बचाव व्हावा म्हणून उघडल्याचे चित्र होते.
पुढील काही दिवस उकाड्याचे
मुंबईमध्ये सध्या तापमानात वाढ जाणवत आहे. उकाडा जास्त आहे. गेल्या ४, ५ दिवसांत कमी पाऊस, दिवसा ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊस पडत आहे. वातावरणातील या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पुढचे काही दिवस वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग