मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता सुरू झालेल्या आॅक्टोबर हीटने मुंबईकरांना तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले असून, आर्द्रता ९४ टक्के नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी कमाल तापमान ३० अंश आणि आर्द्रता ८० टक्के नोंदविण्यात येत होती. कमाल तापमानासह आर्द्रतेमधील वाढीनंतर वातावरणात बदल झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना प्रखर सूर्यकिरणांसह उकाड्याला सामोरे जावे लागत असून, यात उत्तरोत्तर वाढच नोंदविण्यात येणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. ३ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ आणि ५ आॅक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आॅक्टोबर हीट; मुंबईकर घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:34 AM