मुंबईकरांना ‘ऑक्टोबर हिट’ ठरणार तापदायक! पहिल्याच दिवशी पारा गेला ३३.५ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:04 AM2024-10-02T09:04:31+5:302024-10-02T09:49:09+5:30
निरभ्र आकाशामुळे रात्रीतून उष्णतेचे पूर्णपणे उत्सर्जन होत नाही. दिवसागणिक उष्णतेची वाढ होऊन आर्द्रता वाढते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : परतीचा पाऊस अद्याप गुजरात आणि राजस्थानमध्ये असतानाच मुंबईला मात्र पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने बेजार केले आहे. १ ऑक्टोबर रोजी मुंबईचे कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले की, बुधवारी तापमान किंचित कमी होईल किंवा हीट कमी जाणवेल. शनिवार व रविवारपर्यंत मुंबईकरांना तापमान जास्त जाणवेल. त्यानंतर मात्र परतीच्या पावसाची शक्यता आहे.
निरभ्र आकाशामुळे रात्रीतून उष्णतेचे पूर्णपणे उत्सर्जन होत नाही. दिवसागणिक उष्णतेची वाढ होऊन आर्द्रता वाढते. त्यामुळे घाम निघतो. परिणामी, मानवी जिवाची काहिली वाढवते. हा संपूर्ण महिना उष्णतेने होरपळवतो. मुंबईत तर ही स्थिती अधिक तीव्र असते. कारण मुंबई असे बेट आहे की सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा खोली अधिक असल्यामुळे हवेच्या उच्च दाबाच्या उंची अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो.
कुठे होते किती कमाल तापमान?
मुलुंड ३७
घाटकोपर ३७
बोरीवली ३५.५
ठाणे ३५.५
भायखळा ३५
अंधेरी ३३
कुलाबा ३२.८
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई का तापते ?
१) आकाश निरभ्र असते.
२) उष्णता अधिक जमिनीवर पोहोचते. हवा कोरडी होते.
३) आर्द्रता कमी होऊन ७० टक्क्यांपर्यंत येते.
४) कमाल तापमान ३० ते ३४ डिग्रीदरम्यान असते. दिवसाचे १२ तास पूर्ण उष्णता मिळते.
५) किनारपट्टीवरून वाहणारे खारे वारे संथ झाल्यामुळे समुद्राचा थंडावा उशिरा मुंबईच्या भूभागावर पोहोचतो.