मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी हवामानात झालेल्या नाटयपुर्ण घडामोडींमुळे मुंबईकरांना अक्षरश: घाम फुटला. सकाळी ढगाळ हवामान, दुपारी किंचित ऊनं तर कुठे पुन्हा ढगाळ हवामान आणि सायंकाळी सुर्यास्ताला झाकोळलेली मुंबई; अशा ‘ताप’ दायक वातावरणाने मुंबईकरांना ऑक्टोबरच्या दुस-याच आठवड्यात ऊकाड्याने हैराण केले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या वेळापत्रकाप्रमाणे ८ ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरु करणार होता. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असून, परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह उत्तर अरबी समुद्रातच आहे.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाचे वातावरण होते. सकाळी सकाळी मुंबईवर पावसाचे ढग जमा झाले होते. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. दुपारीदेखील सर्वसाधारण हिच परिस्थिती असताना कालांतराने ढगांआडून डोकविणारा सुर्य ब-यापैकी मोकळ्या आकाशात आला; आणि ऊन्हाचा मारा सुरु झाला. त्यात मुंबईतला कोरडेपणा वाढण्यासह गारवा कमी झाल्याने ऊकाड्यात भर पडली. परिणामी ऑक्टोबर हिटचा नव्हे पण ऊकाड्याचा तडाखा मात्र मुंबईकरांना बसला. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल. आणि ही स्थिती पुढचे ६, ७ दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.