उर्फी जावेद प्रकरण आता आणखी तापू लागलं आहे. काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
उर्फी जावेदवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. त्यानंतर, चित्रा वाघ यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसवर त्यांनी खुलासा सादर न केल्यास, त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असा इशाराच चाकणकर यांनी दिला. तसेच, तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली, तर त्यांनी खोटी माहितीही काल दिली, असा खुलासाच चाकणकर यांनी केला.
काय म्हणाल्या होत्या वाघ
चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाच्या दुटप्पीपणावर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. याप्रकरणी दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं होतं.