ठाणे : राबोडीतील अब्दुल मन्नान अब्दुल रशीद काझी (५९) यांनी शनिवारी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.खुर्शीद चाळीतील भाडेकरूंना स्थानिक नगरसेवक हे महापालिका प्रशासनाकडून कायदेशीररीत्या दुरुस्तीची परवानगी मिळवून देतात. त्यामुळे चाळीतील रहिवासी हे मालक म्हणून आपल्याला जुमानत नाहीत, तसेच त्यांनी पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारे पोलीस बंदोबस्तात बांधकाम पूर्ण केल्यास आपण त्यांना चाळीबाहेर काढू शकणार नाही. ही भीती मनात निर्माण करून खुर्शीद चाळीतील रहिवाशांच्या बांधकामात अडथळा यावा, तसेच स्थानिक नगरसेवकांनी चाळीतील भाडेकरूंना मदत करण्यासाठी परावृत्त होण्याच्या हेतूने आणि धमकावण्याच्या इराद्याने महमदीया इमारतीच्या गच्चीवर जाऊन अब्दुल काझी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी सुरुवातीला मुल्ला यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार केली नव्हती. केवळ दोन अनोळखींनी शिवीगाळ, मारहाण केल्याची तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांनी सायंकाळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मात्र, मुल्ला यांचे नाव घेतले. तक्रार करतानाच या सर्व बाबींचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला असता, तर त्या दृष्टीनेही तपास करता आला असता, असे राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.आर. सोनोने यांनी सांगितले. अर्थात, आता नव्याने या सर्वच बाबींचा तपास केला जाणार असून, मुल्ला यांचीही चौकशी केली जाईल, अशीही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा
By admin | Published: November 14, 2016 5:35 AM