पाणबुडी - नौका अपघातप्रकरणी गुन्हा; अपघातात झाला होता दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:11 AM2024-12-03T05:11:17+5:302024-12-03T05:11:48+5:30
या अपघातानंतर बेपत्ता झालेल्या दोन खलाशांचे मृतदेह २८ नोव्हेंबरला सापडले होते.
मुंबई : नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक बसून २१ नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी बोटीच्या तांडेलविरोधात सोमवारी यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातानंतर बेपत्ता झालेल्या दोन खलाशांचे मृतदेह २८ नोव्हेंबरला सापडले होते.
पाणबुडीचे कार्यकारी अधिकारी कमल सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, या अपघाताची चौकशी सुरू आहे. कारवार येथून नौदलाची ‘आयएनएस करंज’ ही पाणबुडी २१ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास गोव्याच्या समुद्र तटाजवळून वेगाने जात होती. त्याचवेळी एफव्ही मारथोमा मासेमारी बोट वेगाने पाणबुडीच्या दिशेने येताना दिसली. दोन्ही बोटींमधील अंतर सुरक्षित करण्यासाठी पाणबुडीचा वेग वाढवून तिची दिशा बदलण्यात आली. पाणबुडीने मासेमारी बोटीपासून बचावाचे सर्व प्रयत्न केले, तरीही ती बोट पाणबुडीला धडकून समुद्रात बुडाली होती.
पाणबुडीवरील अधिकाऱ्यांनी मासेमारी बोटीवरील खलाशांसाठी बचाव मोहीम सुरू केली. नौदलाचे जहाजही बचावकार्यासाठी दाखल झाले. समुद्रात बुडणाऱ्या ५ खलाशांना वाचवण्यात आले, तर उर्वरित सहा खलाशी पोहून जवळच्या मासेमारी बोटीवर पोहोचले.
बुडालेल्या बोटीवरील खलाशांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र, दोन खलाशी बेपत्ता होते. त्यांचे मृतदेह २८ नोव्हेंबरला सापडले.
पाणबुडीचे दहा कोटींचे नुकसान
या अपघाताच्या प्राथमिक चौकशीनुसार नौदलाच्या पाणबुडीचे १० कोटींचे नुकसान झाले आहे. मासेमारी बोटीवरील तांडेलच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू आणि पाणबुडीचे नुकसान केल्याप्रकरणी तांडेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.