Join us

वन अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

वनरक्षक महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप, मुलुंड पोलिसांकड़ून तपास सुरुवनरक्षक महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप, मुलुंड ...

वनरक्षक महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप, मुलुंड पोलिसांकड़ून तपास सुरु

वनरक्षक महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप, मुलुंड पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय वनरक्षक महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठाच्या अत्याचाराला कंटाळून मुलुंड पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे रेंज फॉरेस्ट अधिकारी दिनेश देसले विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार या मुलुंडमध्ये राहण्यास असून वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०१९ पासून देसले वाईट नजरेने पाहत होते. अशात ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी अतिक्रमण संबंधित एक अहवाल घेऊन बंगल्यात बोलावले. तेथे असभ्य वर्तन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पुढे, त्यांच्याशी बोलणे टाळल्यामुळे त्यांनी मोबाईलवर अश्लील संदेश धाडण्यास सुरुवात केली, आणि शरीर सुखाची मागणी केली. मात्र सुरुवातीला आपल्या तक्रारीची दखल कोण घेणार, या भीतीने त्यांनी कुणाकडे वाच्यता केली नाही.

पुढे नशेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे सुरू होते. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कर्तव्यावर असताना प्रेमाची गळ घालून असभ्य वर्तन केले. त्यांनी नकार देत तेथून जाण्याचा प्रयत्न करताच, जातीवरून अपमानास्पद वक्तव्य करत निलंबनाची भीती घातली.

अशात, देसलेकडून मानसिक छळ सुरू असताना ५ मार्च रोजी वनपाल मनीष महाले यांनी जंगलात आग लागल्याचे सांगून सोबत येण्यास सांगितले. त्यानुसार अन्य महिला सहकाऱ्यांसोबत तीन-चार ठिकाणी पाहणी केली. तेव्हा, कुठेही आग लागल्याचे दिसून आले नाही, तरी देखील महाले यांनी संपूर्ण जंगलात शोध घेण्यास सोबत येण्यास सांगितले. मात्र, ते दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. याच रागात महाले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वरिष्ठाकडे तक्रार दिली. त्यानुसार, अंतर्गत चौकशीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच महाले विरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच रागातून देसलेकडून छळ वाढला. नोकरी सोडण्याचा विचारही केला. अखेर, आपल्यावर आलेली वेळ दुसऱ्यावर नको म्हणून महिला कर्मचाऱ्याने मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला. त्यानंतर २३ जून रोजी याप्रकरणी देसलेविरुद्ध विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

....

पोलिसांकडूनच न्यायाची आशा

मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता लवकरात लवकर देसले विरुद्ध कठोर कारवाई करावी. सध्या त्यांच्याकडूनच न्याय मिळेल, अशी आशा असल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले.

....